सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून सुमारे दीड महिन्यापासून गायब झालेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यांमध्ये पावसाचे पुनरागमन झाले आहे. तर बार्शी, माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस तालुके पावसाअभावी कोरडेच राहिले आहेत. त्यामुळे तेथे अजूनही शेतकरी चिंताग्रस्त आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात ३९.७ मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून, यात सोलापूर शहरात ६५.३ मिमी आणि शेळगी या महसूल मंडळात ६६.८ मिमी इतका मुसळधार पाऊस बरसला आहे. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यात ३३.३ तर अक्कलकोटमध्ये ४९.९ इतका पाऊस झाला आहे. मंगळवेढा तालुक्यात २७.६ मिमी तर मोहोळ तालुक्यात २७.३ मिमी पाऊस झाला आहे. पंढरपुरात १५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सांगोल्यात ७.३, माळशिरसमध्ये ५.२ आणि माढ्यात ३.८ मिमी इतक्या बेताचा पाऊस झाला आहे. करमाळा तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात एकूण १७.६ मिमी इतक्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा प्रथमच मे महिन्यात जोरदार पाऊस पडला होता. त्यानंतर जूनमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मृग, आद्रा आणि पुनर्वसु या तीन नक्षत्रात वारे वाहत होते. सुदैवाने यंदा पुष्य नक्षत्रात पावसाने खरीप पिकांच्या पेरण्यांना जीवदान दिल्यामुळे शेतकरी चिंतामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १०३ टक्के एवढ्या खरीप हंगामात पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक ९६ हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या बार्शी तालुक्यात झाल्या आहेत. अक्कलकोट-५६, १२७ हेक्टर, करमाळा-३९, ०९५ हेक्टर, दक्षिण सोलापूर-३०, ४४६ हेक्टर, मंगळवेढा-२९,०६४ हेक्टर, माढा-२७, ४६१ हेक्टर, मोहोळ-१६, १२८ हेक्टर, माळशिरस-१०,१२६ हेक्टर आणि सांगोला-२४३४ हेक्टर याप्रमाणे खरीप पेरण्या झाल्या आहेत.