परभणी : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह येथे बरसलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिवारी अधिक पाऊस येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. आज दिवसभर वातावरण ढगाळ होते. सायंकाळी पाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह परभणी शहरात जोरदार पाऊस झाला.

शहरातील वसमत रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. यापूर्वीही जोरदार पावसानंतर शहरातील वसमत रस्त्यावरील शिवशक्ती बिल्डिंग तसेच अन्यही ठिकाणी पाणी तुंबल्याने रस्त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप काही काळ आल्याचे चित्र होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरेसा पाऊस नसल्याने पेरणीची घाई नको, असा इशारा वारंवार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने देण्यात आला होता. मात्र, पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आताच्या पावसाने पेरणीची चाहूल लागली आहे. या आठवड्यात जोरदार पाऊस सांगितल्याने पेरण्यांनाही प्रारंभ होईल, असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत जो पाऊस झाला, त्यामुळे पेरण्यांना सुरुवात होईल. कृषी साहित्याची खरेदी करून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला आजच्या पावसाने दिलासा मिळाला.