सांगली: दिवसभराच्या तीव्र उष्म्यानंतर विजांच्या कडकडाटासह सुमारे चार तास पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जमिनीची धग निवली. रात्री नऊ वाजलेपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस बुधवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत कमी अधिक जोराने कोसळत होता. नांगरटीच्या रानात पाणी साचले असल्याने पेरणीपूर्व मशागतीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.
गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून, काल मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज होताच. मंगळवारी सायंकाळपासून मिरज पूर्व भागातील बेडग, आरग, खटाव, लिंगणूर परिसरात दमदार सुरू होता. मात्र, हा पाऊस खंडित होता. सांगलीत सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, मिरजेत सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत केवळ ढगांची आकाशात गर्दीच दिसत होती. तथापि, रात्री साडेनऊनंतर मध्यम पावसाच्या सरी कोसळू लागल्या. विजेचा लखलखाट अधिक होता. मात्र, वादळ अथवा जोरदार वारे नसल्याने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पाऊस रेंगाळला होता. सुमारे चार तास पावसाच्या सरी कोसळत होत्या.
पावसाने नांगरटीच्या रानात पाणी साचल्याने उन्हाळी हंगामातील शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यास चांगली संधी निर्माण झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तालीतही पाणी साचले असून आगाप सोयाबीन, हळद लागवडीसाठी पोषक स्थिती या पावसाने निर्माण केली आहे. ओढे, नाल्यांना पाणी वाहून गेले असून काही ठिकाणच्या डोहांत पाणी साचले आहे. ऊसवाढीसाठीही हा पाऊस लाभदायी ठरणार असून, एप्रिल छाटणी झालेल्या द्राक्ष बागांनाही पोषक ठरला असल्याचे सांगण्यात आले.
मिरजेसह तासगाव, आटपाडी, दिघंची, खरसुंडी, जत, कवठेमहांकाळ, डफळापूर, नागज, विटा, खानापूरसह पलूस भागात रात्रीचा दमदार पाउस झाला आहे. शिराळा तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस पडत असून रविवारी ओढ्यांना पूर येण्याइतपत दमदार पाऊस झाला. यामुळे उन्हाळी हंगामातील भात पिकात पाणी साचले असून, खरीप हंगामातील धूळवाफेवर भात पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.