scorecardresearch

कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

heavy rainfall in ratnagiri district due to low pressure belt
हरचिरीकडे जाणाऱ्या मार्गावर टेंब्ये पूल येथे काजळी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे दुपारी वाहतूक बंद झाली होती

रत्नागिरी: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाचा रत्नागिरी, खेड, दापोली, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला असून उर्वरित चार तालुक्यांमध्येही दिवसभर जोरदार पाऊस झाला.    वेगवान वाऱ्यामुळे किनारपट्टी भागात फलक, घराचे छत उडून गेले. मुंबई-गोवा महामार्गावर खेड-भरणे रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळाला नदीचे रूप आले होते. बावनदी, निवळी परिसरात माती रस्त्यावर आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दीड तास बंद पडली. तसेच वादळसदृश्य परिस्थितीमुळे सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मासेमारी बंद राहिली.

हेही वाचा >>> कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत, १२ गाडय़ा रद्द

speeding vehicles killed leopard on samruddhi highway on the eve of wildlife week
समृद्धीने घेतला बिबट्याचा बळी, वन्यजीव सप्ताहाच्या पूर्वसंध्येला घडली घटना
tigers near Vairagad village
अबब… तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ, बघा व्हिडीओ
pathholes on road
सणासुदीच्या काळातही महामार्गावर कोंडी, जागोजागी खड्डे; आठवडाभरापासून प्रवाशांचे हाल
demand for adjacent land to proposed wadhwan port
वाढवण बंदराआधीच जमीनविक्रीला जोर; स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध असतानाही १५०० एकरांचे  व्यवहार

शनिवारी सकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण होते. दिवसभरात एखादी सर पडत राहिली. सायंकाळी मात्र वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर कोसळत होता. रविवारीही दिवसभर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, अर्जुना, काजळी, शास्त्री इत्यादी सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत होत्या. जगबुडी नदीने सायंकाळी इशारा पातळीही ओलांडली. त्यामुळे किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला.  मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

किनारी भागात ताशी २२ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळला होता. भाटय़े किनाऱ्यावरील फलक वाऱ्यामुळे खाली कोसळला. डोंगरातील माती आणि दगडही येथील रस्त्यावर आले होते. भगवती किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दरड कोसळली, तर थिबा पॅलेस येथे एका घराचे छत उडाले. 

हेही वाचा >>> यंदा नऊ जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; सांगलीत सर्वाधिक ४४ टक्के तूट

हरचिरीकडे जाणाऱ्या मार्गावर टेंब्ये पूल येथे काजळी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे दुपारी वाहतूक बंद झाली होती. पावस परिसरात घरावर झाड कोसळल्यामुळे नुकसान झाले.

खेड तालुक्यात तर ढगफुटीसारखा पाऊस झाला. मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथे साचलेल्या पाण्यात वाहनेसुद्धा बुडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर धबधबे वाहत होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच दापोली तालुक्यातील केळशी येथे वहाळाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले. संगमेश्वरमध्ये लोवले येथील नदीचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे तेथील वाहतूक खंडित झाली. लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर, मंडणगडमध्येही दिवसभर पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

रत्नागिरी शहरात विजेचा खेळखंडोबा

वादळी वारा आणि पावसामुळे रत्नागिरी शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. मारुती मंदिर, कोकण नगर, सन्मित्र नगर, मांडवी, रामनाका, झाडगाव या परिसरांतील वीज दुपापर्यंत गायब होती. जयस्तंभ परिसरातही विजेचा लपंडाव चालू होता.

संगमेश्वर बाजारपेठेत पाणी

रविवारी सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे शास्त्री सोनवी, असावी आणि बावनदीने धोकादायक पातळय़ा ओलांडल्या असून संगमेश्वरात राम पेठेसह मुख्य बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये असलेला माल सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे. कसबा बाजारपेठेतील दुकानांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील बावनदी, शास्त्री आणि सोनवी पुलाने पहिल्यांदाच धोकादायक पातळी गाठली होती. संगमेश्वर-देवरुख राज्य मार्गावर लोवले या ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राज्यमार्गाची वाहतूक काही काळ ठप्प होती. महामार्गावरील चौपदरीकरणाची कामेही थांबवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या रहिवासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rainfall in ratnagiri district due to low pressure belt formed in arabian sea zws

First published on: 02-10-2023 at 04:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×