संगमनेरः तालुक्यात सोमवारी विजांच्या प्रचंड कडकडाटासह काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाने शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती मिळाली.
तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज दुपारनंतर पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. कांदा, भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी अनेक घरांची पडझड झाल्याचे समजते. निमगाव भोजापूर, निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी, नांदुरी, राजापूर, चिकणी या गावांच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या भागातील डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतातून काढलेला कांदा शेतातच थप्पी लावून साठवून ठेवलेला होता.हे कांदेही पूर्णपणे भिजले गेले. शहरातही अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार झाले.
दरम्यान प्रशासनाने सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत. शासनाकडून लवकरात लवकर जास्तीतजास्त मदत मिळवून द्यावी. आपण स्वतः सर्व ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहोत असे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.