छत्रपती संभाजीनगर / सांगली / सावंतवाडी / मुंबई : राज्यभरात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बहुतांश ठिकाणी वळवाच्या पावसाचा मुक्काम होता. मराठवाड्यात बुधवारी रात्री अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना आणि लातूर या चार जिल्ह्यांतील २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदिवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. पश्चिम महाराष्ट्रातही सर्वदूर वरुणराजाने हजेरी लावली.
मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा, वाळुज, तसेच ग्रामीण भागातील सिल्लोड, निल्लोड पीरबावडा, वडोदबाजार, बाबरा या महसूल मंडळात किमान ६७ आणि कमाल ८९ मिमी पावसाची नोंद झाली.
रायगड जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार सुरू असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे कोकम, फणस, आंब्याला फटका बसला. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था कोलमडून गेली.
पश्चिम महाराष्ट्रातही गेले चार दिवस पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्याला वळवाच्या पावसाने झोडपून काढले असून, सातारा शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
सांगलीत सरासरीच्या अडीच पट
सांगली जिल्ह्यात मे महिन्यात सरासरीच्या अडीच पट पाऊस झाला असून जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत १२७ मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात पाच ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, येरळा नदीला पूर आला आहे.
लातूरमध्ये सलग बाराव्या दिवशी पाऊस
लातूर शहर आणि परिसरात गुरुवारी सलग बाराव्या दिवशी जोरदार पाऊस पडला. वळवाचा पाऊस हा एखाद-दुसऱ्या दिवशी पडून गायब होतो. या वर्षी मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच मे महिन्यात पावसाळ्यासारखे वातावरण तयार झाले आहे. कधी नव्हे ते उन्हाळ्यात नद्यांना पाणी आले असून, रेणा नदीवरच्या छोट्या क्षमतेच्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. धाराशिव, जालन्यातही असेच चित्र दिसून येत आहे.
तातडीने पंचनाम्याचा आदेश
राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.