सातारा : साताऱ्यात वळवाच्या पावसाचा जोर दुष्काळी फलटण, माण तालुक्यात कायम आहे. या पावसाने साताऱ्यातील अनेक भागांना झोडपून काढले. फलटणमध्ये धुमाळवाडीत ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसामुळे गावात पूरस्थिती निर्माण झाली. फलटण येथील बाणगंगा नदीला पूर आला आहे. फलटणमध्ये फलटण कोळकी रस्त्यावर ओढ्याच्या पुरामध्ये दुचाकीस्वार अडकला होता. ग्रामस्थांनी दुचाकी स्वाराला तातडीने बाहेर काढले.

देशभरात फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धुमाळवाडीत आज ढगसदृश पाऊस झाला. त्यामुळे गाव अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडले आहे. ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली. गावाजवळचा पूल वाहून गेल्याने धुमाळवाडीसह जवळपास ३५ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

साताऱ्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या या गावात पडलेल्या पावसाने शेती आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्थानिक ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या पन्नास वर्षांत उन्हाळ्यात मे महिन्यात असा पाऊस प्रथमच पाहिला आहे. लोकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. या दुष्काळी तालुक्यात सर्वत्र शेतामध्ये पाणी साठले आहे. पुढे नाले भरून वाहत आहेत. संपूर्ण शेती जलमय झाली असून, अनेक फळझाडे उन्मळून पडली आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीने त्रस्त असलेला हा भाग आता या अचानक आलेल्या संकटामुळे पूर्णपणे हतबल झाला आहे.

दरम्यान हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या संकटामुळे धुमाळवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावातील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी काळ बनून आला आहे. प्रशासनाकडून अद्याप मदतकार्य सुरू झाले नसले तरी, संपर्क तुटल्याने बचावकार्याला अडथळे येत आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
रामदास पाटील, शेतकरी धुमाळवाडी