सातारा: लांबलेल्या पावसाचा महाबळेश्वर, वाई, जावली तालुक्यातील स्ट्रॉबेरी लागवडीस फटका बसला आहे. या अतिरिक्त पावसामुळे स्ट्रॉबेरीची रोपे तयार होऊ न शकल्यामुळे हा फटका बसला आहे. सध्या उपलब्ध रोपांवर या भागात केवळ पन्नास टक्केच स्ट्रॉबेरी लागवड झाली असून, ही आजवरची सर्वांत कमी लागवड मानली जात आहे. दरम्यान, यंदा स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या या टंचाईमुळे त्यांना परराज्यांतून मोठी मागणी आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई आणि जावली तालुके हे स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहेत. येथील थंड हवामान आणि सुपीक माती यांमुळे या भागात स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पादन मिळते. विशेष म्हणजे याच अनुकूल भागात तयार झालेल्या मूळ रोपापासून (मदर प्लांट) तयार झालेल्या स्ट्रॉबेरीच्या रोपांना आता राज्याबरोबरच परराज्यांतही कायम मोठी मागणी असते.
स्ट्रॉबेरीच्या मूळ रोपांपासून नवीन, दर्जेदार आणि रोगमुक्त रोपे तयार केली जातात. प्रत्येक हंगामात प्रतिएकरात दोन ते अडीच लाख रोपांची निर्मिती केली जाते. ही रोपे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई आणि जावली तालुक्यांसह राज्यात अन्यत्र तसेच परराज्यांतील स्ट्रॉबेरी उत्पादकही खरेदी करतात. महाबळेश्वर परिसरातील अनेक शेतकरी केवळ अशी स्ट्रॉबेरी रोपे तयार करण्याची शेतीही करतात. मात्र यंदा मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या शेतीचे गणित बिघडले. ही रोपे तयार करण्यासाठी आवश्यक जमीन तयार करण्यात अडचणी आल्या.
रोपांच्या लागवडीनंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू राहिल्याने शेतात कायम पाणी साचून राहिल्याने या रोपांची चांगली उगवण झाली नाही. उगवलेली रोपे पिवळी पडली. या साऱ्यांमुळे यंदा स्ट्रॉबेरी रोपांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, वाई आणि जावली या तीन तालुक्यांतील एकूण उत्पादनास मोठा फटका बसला आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी यंदा रोपेच उपलब्ध नसल्याने आतापर्यंत या तालुक्यातील स्ट्रॉबेरीची लागवड केवळ पन्नास टक्केच झाली असून, ही आजवरची सर्वांत कमी लागवड मानली जात आहे.
सध्या ज्यांच्याकडे ही स्ट्रॉबेरीची रोपे त्यांच्याकडे जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांसह अन्य जिल्ह्यातीलच नाही, तर परराज्यांतूनही मोठी मागणी आहे. यामुळे एरवी ५ ते ७ रुपये असलेल्या स्ट्रॉबेरीच्या प्रतिरोपांचा दर यंदा ८ ते १२ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सध्या ज्यांच्याकडे स्ट्रॉबेरीची रोपे आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे.
दरम्यान, या टंचाईमुळे स्ट्रॉबेरी रोपांना राज्यांतर्गतच नाही, तर राज्याबाहेरून यंदा मोठी मागणी आहे. परराज्यांतील अनेक शेतकरी आणि एजंट सध्या थेट महाबळेश्वर, वाई आणि जावली तालुक्यांमध्ये येऊन रोपे खरेदी करतात. पंजाब, हरयाणा, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि हैदराबाद येथील शेतकरीदेखील येथे येऊन रोपे खरेदी करतात.
पावसाचा फटका
वाई, जावळी, महाबळेश्वर तालुक्याचा भाग हा स्ट्रॉबेरी उत्पादनासोबतच स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा मे महिन्यापासून सातत्याने पाऊस असल्यामुळे स्ट्रॉबेरी रोपांच्या उत्पादनास फटका बसला असल्याचे स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी सांगितले.
रोपांचे उत्पादन घटले
मुसळधार पावसाने यंदा स्ट्रॉबेरी रोपांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. सध्या जी रोपे या आपत्तीतून वाचली आहेत, त्यांना मोठी मागणी आहे. परराज्यांतूनदेखील अनेक शेतकरी या रोपांच्या खरेदीसाठी महाबळेश्वर परिसरात येत असल्याचे स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादक तुषार शिवतरे यांनी सांगितले.
महाबळेश्वर परिसरात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका स्ट्रॉबेरीच्या रोपांना बसला. उत्पादनात मोठी घट झाली आहे. आम्ही दर वर्षी स्ट्रॉबेरी रोपे तयार करतो. त्यांना पंजाब, हरियाणा, दिल्ली इथून थेट मागणी असते. यंदा रोपांचे उत्पादन कमी असल्यामुळे मागणी मोठी असल्याचे स्ट्रॉबेरी उत्पादक प्रवीण पवार यांनी सांगितले.