नांदेड: छत्रपती संभाजीनगर गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने नांदेड आणि लातूर जिल्ह्यास अतिवृष्टीचा पुन्हा मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यातील ३०, नांदेडमधील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची झाली. या सर्वाधिक नायगाव तालुक्यातील नरसीमध्ये ११५ मिलीमीटर पाऊस झाला. नायगाव शहरातील अनेक घरांमध्ये आता पाणी शिरू लागले आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.

नायगाव आणि परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे. यामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून रात्री झालेल्या पावसामुळे खालील मार्गावर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे माणकेश्वर – उदगीर, बोटकुळ – निलंगा, अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर-अतनूर-बाराळी रस्ता बंद आहे. उटी व अलमला रस्त्यावरतसेच दैठना येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. औसा ते हसलगन रोडवर जवळगावाडी येथे पुलावरून पाणी जात आहे. तसेच एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बंद आहे. धडकनाळ बोरगावच्या पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

नायगाव तालुक्यातील नरसी – बिलोली हा मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यात पुन्हा मुळसधार पावसाने थैमान घातले आहे. जाहूर – उंद्री – देगलूर हा मार्ग बंद झाला आहे. शेत शिवारात जिकडे – तिकडे पाणीच पाणी घुसले आहे. त्यामुळे आधीच पाण्यात असलेली पिके आता पूर्णत: वाया गेली आहेत.

रेल्वे सेवा विस्कळीत

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पावसामुळे नांदेडहून पुढे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या असून काहीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे दक्षिणेत जाणारी रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले.