अकोले: तालुक्यात ऐन मे महिन्यात आठवडाभरापासून पावसाळ्यासारखा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी धोधो कोसळलेल्या पावसाने पिकांची वाताहत झाली आहे. शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांची पडझड, झाडे कोसळणे यामुळे मालमत्तेचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मे महिन्यातच या अवकाळीने धरणात थोड्या प्रमाणात पाणीही आले आहे. भंडारदरा धरणात सध्या ३१ टक्के पाणी शिल्लक आहे. या वर्षीच्या पावसाची सुरुवात वादळी झाली. आठवडाभरापासून तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. आदिवासी भागासह प्रवरा, आढळा खोऱ्यास पावसाने अनेकदा झोडपले. दिवसभर कडक ऊन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असा सध्याचा माहोल आहे. प्रवरा, आढळा विभागात काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडला. ओढे नाले वाहिले. डोंगरावरून धबधबे कोसळले. अनेक शेतात पाणीच पाणी झाले. कांदा, टोमॅटो, आंबे, कोथिंबीर, भाजीपाला, मका, काढणीस आलेली उन्हाळी बाजरी, उन्हाळी भुईमूग आदी पिकांचे ठिकठिकाणी नुकसान झाले.
ऐन उन्हाळ्यात पावसाचा शेतीला मोठा फटका बसला. काही ठिकाणी वादळी पावसाने घरांची पडझड झाली. घरावरील कौले, पत्रे उडाले. झाडेही पडली.अकोले शहर आणि परिसरात आज सलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. तास-दीड तासाच्या पावसाने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. काल शहरात दोन अडीच तासात दोन इंचांपेक्षा अधिक म्हणजे ५३ मिमी पाऊस पडला.
भंडारदरा धरणात आजपर्यंत १६८ दलघफूट नवीन पाणी जमा झाले. आज सकाळी ३ हजार ४३५ दलघफूट (३१.१२ टक्के) पाणीसाठा होता. धरणातून ९५५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा आज सकाळी १ हजार ९९६ दलघफूट (२३.९७ टक्के) होता. धरणाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून ३०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात तसे उच्चस्तरीय कालव्यातून सुरू असणारा विसर्ग बंद झाला आहे. आज सकाळपर्यंत २४ तासांत झालेला पाऊस (मिमीमध्ये) पुढीप्रमाणे. भंडारदरा ३, घाटघर १६, पांजरे १३, रतनवाडी १९, वाकी ३, निळवंडे १९, आढळा २८, अकोले ५३.