छत्रपती संभाजीनगर, जालना : मराठवाड्यात मंगळवारी पुन्हा अतिवृष्टी झाल्याने जालना, लातूर, धाराशिव हे जिल्हे अक्षरश: जलमय झाले आहेत. जालना जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. अनेक पुलांवर पाणी वाहू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. लातूर जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जालना शहरात तर रस्ते जलमय झाले. दुकानांमध्ये पाणी शिरले. शिवारच जलमय झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा ४१ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली. अंबड तालुक्यात सर्वाधिक १२६ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
जालना शहरात सोमवारी रात्रभर झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक भागांत घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. शहरातील अनेक वस्त्यांना तलावाचे तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. रात्रभरात जालना शहरात ८१.५ मि. मी तर तालुक्याच्या ग्रामीण भागात ८९ मि.मी. पावसाची नोंद झाली.
शहरातील लालबाग भागात पावसामुळे अडकलेल्या १२ व्यक्तींची तर टांगा स्टॅण्ड भागात घरात अडकलेल्या एका महिलेची अग्निशमन विभागाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. नीलम चित्रपटगृहाच्या बाजूने जाणाऱ्या नाल्याचे पाणी अनेक घरांत घुसले. रेल्वेस्थानक रस्त्यावरील अनेक दुकाने आणि उपाहारगृह जलमय झाली. सुखशांतीनगर, त्रिमूर्तीनगर, सिंदखेड राजा वळण रस्ता, साठेनगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अनेक झोपड्यांतील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मंठा रस्त्यावरील चौधरीनगर परिसर त्याचप्रमाणे भाग्यनगर भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी सकाळीच जालना शहरातील लालबाग, लक्कडकोट यांसह अन्य भागांची पाहणी करून महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या. शहरातील सीना आणि कुंडलिका नद्यांनाही मोठे पाणी आले होते.
लातूरमध्ये पावसाचे थैमान
लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला असून, सोयाबीनसह खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे निलंगा तालुक्यातील गुराळ गावाजवळील पुलावर पूरस्थिती निर्माण झाली. गुराळ-सावनगीरा मार्गावरील हा पूल पाण्याखाली गेल्याने सावनगीरा आणि बोटकुळ गावांशी संपर्क तुटला होता. प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
लातूर शहरासह औसा, किल्लारी, लामजना, निलंगा, लातूर ग्रामीण, चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातील अनेक भागांत पाणी साचले होते. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी वाऱ्यासह पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शेती पाण्याखाली गेल्याने सोयाबीन, मूग आदी काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तावरजाचे १२ दरवाजे उघडले
दरम्यान, पावसामुळे प्रकल्पातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उटी येथील तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण १२ दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, सध्या १ हजार ३८१ क्युसेक इतका विसर्ग तावरजा नदीपात्रात, तर रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
१५ मंडळांमध्ये अतिवृष्टी
मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४८.८ मि. मी. पाऊस झाला. जालना शहर, जालना ग्रामीण, सेवली, रामनगर, पाचन वडगाव, वरूड, परतूर, अंबड, गोंदी, वडिगोद्री, सुखापुरी, तीर्थपुरी, अंतरवाली, कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ या पंधरा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जीवरेखा, ऊर्ध्व दूधना आणि गल्हाटी हे मध्यम सिंचन प्रकल्प भरून वाहत आहेत. ५८ पैकी ३१ लघुसिंचन प्रकल्प भरून वाहत आहेत.
वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी
भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे गावातील समाधान बाबुराव साबळे यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर घनसावंगी तालुक्यातील श्रीकृष्णनगर येथील बाबू तुळशीराम चव्हाण वीज पडून जखमी झाले. जालना तालुक्यातील खणेपुरी घनसावंगी तालुक्यातील दैठणा खुर्द आणि उक्कडगाव येथे वीज पडल्याने जनावरे दगावली.