कराड : पश्चिम घाटमाथ्यासह कोयना धरणाच्या पाणलोटात पावसाची बऱ्यापैकी उघडीप असली तरी कमालीच्या उष्म्यानंतर अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस होत आहे. त्यात सोमवारी पाथरपुंजला तब्बल साडेबारा इंच पाऊस झाला आहे. सातारा, कराड या शहरांसह काही ठिकाणी पाऊस दैना उडवत आहे. आजही सातारा व कराड शहर परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

कोयनेसह अन्य जलाशय क्षमतेने भरल्याने जलसाठा नियंत्रणासाठी या जलाशयांमधून होणारा जलविसर्गही पावसाच्या उघडीपमुळे बंद आहे. त्यामुळे जलसाठे स्थिरावताना, नद्या पूरस्थितीतून बाहेर पडून पूरभय टळले आहे. दरम्यान, अपेक्षेपेक्षा ज्यादा झालेल्या मशागतीची कामे गतीने सुरु असतानाच पुन्हा जोरदार पाऊस कोसळू लागल्याने पिकांची वाढ खुंटणे, ती पिवळी पडणे, त्यातून उत्पादनाचा दर्जा घसरणे, उत्पन्न घटणे हे स्वाभाविक असल्याने शेतकरी वर्गापुढे पुन्हा चिंतेचे ढग दाटले आहेत.

हेही वाचा >>>Pen Ganesh Idols: पेण मधून यंदा २६ हजार गणेशमूर्तींची परदेश वारी

कोयना धरणाचा जलसाठा आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता ९०.६७ अब्ज घनफूट / टीएमसी (८६.१५ टक्के) झाला आहे. तुलनेत हा जलसाठा अतिशय मजबूत असून, अशीच स्थिती पश्चिम घाटक्षेत्रातील अन्य धरणसाठ्यांची राहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी दिवसभरात कोयनेच्या पाणलोटात केवळ एक मिलीमीटर तर, आजवर एकूण ४,८००.३३ मिलीमीटर (एकूण सरासरीच्या ९६ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर, पाथरपुंजला सर्वाधिक ३२० (१२.६० इंच) खालोखाल गजापूरला ७८, वाठार स्टेशन १७, धनगरवाडा १३ व तारळी धरण परिसरात १० मिलीमीटर पावसाची नोंद आहे. अन्यत्र तुरळक पाऊस दिसत आहे.