सावंतवाडी : वैभववाडी तालुक्यात आज गुरुवारी सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी आज विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते, या पावसामुळे या सोहळ्यांमध्ये मोठा व्यत्यय आला.

या अवकाळी पावसाचा फटका अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा आणि काजूच्या पिकालाही बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि आज सकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे तालुक्यातील कुसर, कुंभवाडे, करूळ, नावळे, खांबाळे या प्रमुख गावांसह अन्य भागांमध्येही जोरदार पाऊस झाला.