अलिबाग :- अलिबाग ते मांडवा दरम्यानच्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. जिवनावश्यक वस्तूंची ने आण करणाऱ्या अवजड वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
मुंबई ते मांडवा दरम्यान रो रो सेवा सरू झाल्यापासून अलिबाग ते मांडवा दरम्यानच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. या शिवाय मांडवा ते गेट वे दरम्यान सुरू असलेल्या जलवाहतूक सेवेचा वापर करून हजारो पर्यटक अलिबागला दाखल होत असतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी समस्या निर्माण होत होती. वाहनांची संख्या वाढल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले होते. रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत होती.
या शिवाय मांडवा ते अलिबाग दरम्यान मोठ मोठाल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उभारणी केली जात आहे. यासाठी अलिबाग मांडवा मार्गवरून मोठ्या प्रमाणात माती, खडी, सिमेंट यांची वाहतूक केली जात आहे. या अवजड वाहतूकीमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. त्यामुळेही या मार्गावरील वाहतूक नियंत्रित करणे आवश्यक झाले होते.
गेल्या काही वर्षात अलिबाग हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. दरवर्षी दहा ते बारा लाखांहून अधिक पर्यटक या परिसराला भेट देत असतात. कोकणातील सर्वात पर्यटकांची वर्दळ असलेले ठिकाण म्हणूनही अलिबाग ओळखले जाते दर शनिवारी आणि रविवारी मुंबईतून पंधरा ते वीस हजार पर्यटक अलिबाग परिसरात दाखल होत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांच्या प्रचंड वर्दळ या परिसरात असते. यामुळे वाहतुकीवरचा ताण वाढतो. मार्गावर लांबच लांब रांगा लागतात. कोंडीमुळे प्रवासाकरीता जास्तीचा वेळ लागतो. तसेच आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांची गैरसोय होते. त्यामुळे सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ या कालावधीत अलिबाग मांडवा मार्गावर सर्वप्रकारच्या जड आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहे. पुढील आदेश निघेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे.
या बंदी आदेशाच्या अधिसूचनेतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहन नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका यांना वगळण्यात आले आहे.
