मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची ग्वाही

पालघर : चक्रीवादळात यावेळी ज्या मच्छीमारांचे नुकसान झाले आहे अशांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यात येईल असे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी पालघर दौऱ्यादरम्यान जाहीर केले.चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या बोटींचे व इतर साहित्याचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख पालघर दौऱ्यावर आले होते.

पालघर तालुक्यातील उसरणी, टेम्भी येथील मच्छीमार बांधवांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले होते. त्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मदत दिली जाईल असे आश्वस्त केले.यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,पालघरचे खासदार, आमदार उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी उसरणी येथील मच्छीमार बोटींचे नुकसान झालेल्या समुद्रातील घटनास्थळालाही भेट दिली. तसेच ठिकठिकाणी समुद्र किनाऱ्यालगत केळीच्या,नारळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून त्याचाही नुकसानभरपाईबाबत सरकारला सांगणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

आमदार आशीष शेलार यांना टोला

आशीष शेलार यांनी केलेल्या टीकेच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शेख यांनी आरोप—प्रत्यारोप करण्यापेक्षा शेलार व देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदत जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. रेमेडिसिविर इंजेक्शनबाबत बोलताना अस्लम शेख यांनी महाराष्ट्रातील रुग्णालयात या इंजेक्शनची आवश्यकता असताना भाजपच्या पदाधिकारीकडे ती आलीच कशी व ती पुरविणाऱ्याना वाचविण्यासाठी मोठी फौज पोलीस ठाण्यात दाखल झाली हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे