PLGA Chief Hidma Violent History : नक्षलींच्या सशस्त्रदलाचा (पीएलजीए) चा प्रमुख व अबूजमाड परिसरातील अनेक हिंसक कारवायांचा सूत्रधार अशी ओळख असलेला माडवी हिडमा मारला जाणे या चळवळीच्या शेवटाची सुरुवात आहे. सुरक्षा दलांच्या आक्रमक शोधमोहिमांमुळे चारही बाजूंनी कोंडी झालेल्या चळवळीच्या या सर्वोच्च नेत्याला निर्णायक क्षणी योग्य प्रतिकारसुद्धा करता आला नाही हे सुद्धा या चमककीतून दिसून आले. हिडमाच्या मृत्युमुळे नक्षलींच्या सशस्त्र दलाचा कणाच मोडला असून आता या चळवळीच्या अंताची केवळ औपचारिकता तेवढी शिल्लक राहिली आहे.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील पूर्वती या गावात जन्मलेला हा आदिवासी तरुण चळवळीत दाखल झाला ते साल होते १९९१. तेव्हा तो केवळ चौदा वर्षाचा होता. नक्षलींच्या लढ्याची वैचारिक बाजू ठाऊक नसलेला पण सरकार आदिवासींवर अन्याय करते एवढेच डोक्यात ठेवणाऱ्या या तरुणाने गेल्या ३४ वर्षांत सुरक्षा दलांना अनेकदा सळो की पळो करुन सोडले.

नक्षली युद्धाचा रणनीतीकार

या चळवळीची सुरुवात झाली तेव्हा सरकारशी कसे लढायचे याची कार्यपद्धती ठरलेली नव्हती. नंतर प्रभावक्षेत्र निर्माण झाल्यावर तयार झालेले दलम बचावात्मक पद्धतीने सरकारशी युद्ध करू लागले. सुरक्षा दलांनी आक्रमण केले तरच त्याला प्रत्युत्तर द्यायचे. सापळे रचायचे. त्यात कुठेही चळवळीची मनुष्यहानी होऊ द्यायची नाही. शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान कसे होईल एवढेच बघायचे. ही परंपरागत पद्धत बदलून आक्रमक पद्धतीने युद्ध करण्याची रणनिती आखणारा हिडमा पहिला नक्षली होता. दंडकारण्य स्पेशल झोन समितीत स्थान मिळाल्यावर दहा-बाराच्या संख्येत फिरणारे दलम नाही तर शंभरच्या संख्येत फिरणाऱ्या बटालियन तयार करून सुरक्षा दलांवर हल्ले करण्याची पद्धत अंमलात आली ती हिडमाच्या नेतृत्त्वात. तेव्हापासून बटालियन क्रमांक एकचा कमांडर झालेला हिडमा केंद्रीय समितीत स्थान मिळून सुद्धा शेवटपर्यंत याच बटालियन सोबत राहिला व शेवटी मारला गेला.

३४ वर्षे गुंगारा

स्थानिक असल्यामुळे त्याला घनदाट जंगल असलेल्या अबूजमाडची खडा न् खडा माहिती होती. त्यामुळे सलग ३४ वर्षे तो कधीच सुरक्षा दलाच्या हाती लागला नाही. त्याला पकडण्यासाठी दलांनी अनेकदा सापळे रचले, पण प्रत्येकवेळी त्यातून बाहेर पडण्यात तो यशस्वी झाला. संपूर्ण अबूजमाड परिसरात त्याचा दरारा होता. मोठ्या संख्येत सुरक्षा दले तैनात असतांना सुद्धा पत्रकारांना मुलाखती देण्याचे धाडस त्याने अनेकदा दाखवले. अबूजमाडच्या खाली येऊन कारवाया करुन परत मुख्य तळावर जाण्यासाठी कोणते मार्ग निवडायचे, कुठे मुक्काम करायचा याची आखणी फक्त आणि फक्त हिडमा करायचा.

थरकाप उडवणारे हत्याकांड

हिडमाची ही खासियत लक्षात घेऊनच नक्षलींच्या वरीष्ठ नेतृत्त्वाने प्रत्येक मोठ्या हल्ल्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. २०१० मध्ये चिंतलनारजवळ ७६ जवानांचे शिरकाण नक्षलींनी केले. त्यातही तो आघाडीवर होता या चळवळीला सर्वात मोठा फटका बसला तो सलवाजुडूमचा. हे आंदोलन अपयशी ठरल्यावर त्याचे सूत्रधार असलेले काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा यांना ठार मारण्यासाठी हिडमाने जो सापळा रचला त्याची नोंद लष्करी कारवायांच्या इतिहासात अग्रक्रमाने घेतली जाईल. यात अडकलेल्या कर्मासह एकूण २२ नेत्यांना हिडमाने निर्दयीपणे ठार मारले. अर्थात या हल्ल्याचे नेतृत्त्व पापारावने केले होते, पण घटनास्थळावर एकेकाला जाब विचारत गोळी घालणारा हिडमाच होता. या दोन मोठ्या हत्याकांडासह अनेक सुरक्षा जवानांचे बळी हिडमाने वेगवेगळ्या चकमकीत घेतले.

एकमेव आदिवासी नेता

नक्षली चळवळीचा उगम आंध्र प्रदेशातला. याचे नेतृत्त्व आरंभापासून उच्चवर्णियांकडे राहिले. ही चळवळ लढली आदिवासींसाठी. जल जमीन जंगल या मुद्यावर. तरीही नक्षलींना एकही आदिवासी नेता तयार करता आला नाही. हिडमा हा एकमेव अपवाद होता. वैचारिक बाजू कमजोर असल्यामुळे तो कायम युद्धभूमीवर अग्रेसर राहिला.

जुन्या मित्रांकडून दगा

अलीकडच्या काळात नक्षलींना मिळणारे मनुष्यबळ कमी झाले. आदिवासींमधील तरुण मुले चळवळीकडे पाठ फिरवू लागली. सुरक्षादलांनी दुर्गम भागात तळ उभारले. त्यामुळे नक्षलींच्या हालचालीवर मर्यादा आल्या. परिणामी अनेक सदस्य आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारू लागले. गेल्या जूनमध्ये नक्षलींचा प्रमुख बसवा राजू ठार झाल्यावर अनेक वरिष्ठांनी समर्पणाचा मार्ग स्वीकारला. त्याआधी सरकारने चर्चा करावी अशी मनधरणी करणारी पत्रके निघाली. या साऱ्या हवालदिल करणाऱ्या परिस्थितीपासून दूर होता तो केवळ हिडमा. त्याने कधीही समर्पणाची भाषा केली नाही.

जी लढाई सुरू केली ती मृत्यूनंतर थांबेल असे तो सतत त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना सांगत राहिला. मात्र, जे नक्षली शरण आले त्यांनी आणीबाणीच्या स्थितीत हिडमा कुठे कुठे आश्रय घेऊ शकतो याची माहिती सुरक्षा दलांना दिली. त्याच्या आधारे हिडमाचा शोध घेणे सुरू झाले व शेवटी तो सुद्धा सुरक्षादलाच्या जाळ्यात अलगद अडकला. अगदी कमी वयात केंद्रीय समितीत समावेश झालेला हिडमा पहिला व शेवटचा आदिवासी ठरला. आता इतक्या कठीण परिस्थतीत सुरक्षादलांशी दोन हात करणारे या चळवळीत कुणीही उरलेले नाही. त्यामुळे ही या चळवळीच्या शेवटाची सुरुवात आहे, असे ठामपणे म्हणता येते.