शिर्डीत मानवी तस्करी? हायकोर्टाचे चौकशीचे आदेश

२०१७ ते ऑक्टोबर २०२० दरम्यान शिर्डीतून २७९ लोक बेपत्ता

मनोज सोनी यांचा २०१७ मधील पत्नीसोबतचा फोटो

मनोज सोनी यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये आपल्या कुटुंबासोबत १५ दिवसांची सुट्टी घेऊन फिरण्याचा बेत आखला होता. पण यामध्ये शिर्डीला जाण्याची कोणतीही योजना नव्हती. अहमदाबाद येथून वैष्णोदेवीला जाण्यासाठी मिळालेली ट्रेन तिकीट एका महिन्यानंतरची होती. ९ ऑगस्टला सोमनाथ, द्वारका आणि नागेश्वर ज्योतीर्लिंग मंदिरांना भेट दिल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आरक्षित तिकीट नसताना इतका लांबचा प्रवास करण्यापेक्षा त्यांनी आणि पत्नीने बसने शिर्डीला जाण्याचं ठरवलं.

१० ऑगस्टला इंदोरमधील हे कुटुंब शिर्डीला साईबाबा मंदिरात पोहोचलं. “मुलांसोबत आम्ही तिथे मजेत वेळ घालवत होतो. पत्नीला जवळील दुकानांमध्ये खरेदी करायची होती. मुलं हट्ट करतील म्हणून पत्नीला एकटीलाच पाठवलं होतं,” असं मनोज सोनी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे. तेव्हापासून मनोज सोनी यांची पत्नी दिप्ती बेपत्ता आहे.

मनोज सोनी यांनी आपल्या पत्नीच्या शोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असून अखेर न्यायालयाने दखल घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र पोलिसांना प्रसिद्ध मंदिर असणाऱ्या शहरांमधून बेपत्ता झालेल्या अशा प्रकरणांचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. त्यासोबत यामध्ये मानवी तस्करीचा काही संबंध आहे का यादृष्टीने तपास करण्यास सांगण्यात आलं आहे.

२९ ऑक्टोबरला न्यायालयाने मनोज सोनी यांनी केलेल्या याचिकेची दखल घेतली. गेल्या तीन वर्षांपासून आपण पत्नीचा शोध घेत असून यादरम्यान पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप त्यांनी केली आहे. यावर न्यायालयानेही मानवी तस्करीच्या दृष्टीने तपास न केल्याबद्दल शिर्डी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी जाहीर केली आहे.

पोलिसांनी बेपत्ता झालेल्यांचा मानवी तस्करी किंवा अवयव तस्करी रॅकेटशी काही संबंध आहे का हे गूढ उकलणं महत्वाचं आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पोलिसांच्या डेटानुसार, २०१७ ते ऑक्टोबर २०२० दरम्यान शिर्डीतून २७९ लोक बेपत्ता झाले आहेत. ६७ जणांची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. यामध्ये विवाहित आणि अविवाहित महिलांचाही समावेश आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक अँगलने तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. शिर्डीमधून बेपत्ता झालेल्यांची माहिती न्यायालयात दिली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. याआधी न्यायालयाने २०१९ मध्ये शिर्डीतून एका वर्षात ८८ जण बेपत्ता झाल्याची दखल घेतली होती. या सर्व प्रकऱणांमध्ये हे लोक मंदिरात दर्शनासाठी आल्याचा समान धागा असल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणून दिलं होतं.

मनोज सोनी आणि दिप्ती यांचं २७ फेब्रुवारी २००९ मध्ये लग्न झालं होतं. लग्न कुटुंबाने ठरवलेलं असलं तरी आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो असं ते सांगतात. “गेल्या तीन वर्षात पत्नीला शोधण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडली नाही. एका अनोळखी व्यक्तीने पत्नीला पुणे स्थानकावर पाहिल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही तपासलं. देहविक्री होणाऱ्या परिसरातही गेलो. कल्याणला एका तांत्रिकाला भेटण्यासाठी दोनदा गेलो. कोपरगावमध्ये एक टोळी लोकांचं अपहरण करत असल्याचंही शिर्डी पोलिसांन कळवलं. पण नेहमी आपल्या हाती निराशा आली,” असं मनोज सोनी हतबल होऊन सांगतात.

पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत का यादृष्टीनेही आपण चौकशी केली. पण तसं काहीच नसल्याचंही ते म्हणतात. पत्नीचा शोध घेण्यासाठी मनोज सोनी ड्रायव्हिंगची नोकरी करत असून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंडला जात असतना त्यांची आई दोन्ही मुलांची काळजी घेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: High court orders human trafficking angel in missing person probe in shirdi sgy

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ नाशिकमध्ये
ताज्या बातम्या