परतीच्या अतिरिक्त पावसाचा फटका बसल्यामुळे सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत आवक घटलेल्या कांद्याचा भाव चांगलाच वधारला आहे. काल सोमवारी प्रतिक्विंटल ७५०० रुपये इतका कांद्याला उच्चांकी दर मिळाला. त्यानतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी त्यात थोडीशी घट होऊन प्रतिक्विंटल ६५०० रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला. गेल्या ऑक्टोबरमध्ये व चालू नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेती बाजारात कांद्याची आवक घटली आहे. परिणामी, कांद्याचा दर वाढला आहे.
मराठवाडय़ासह कर्नाटक तसेच सांगली व पुणे भागातूनही कांद्याची आवक सोलापुरात होते. कांदा खरेदी-विक्रीतून वार्षिक सुमारे ७०० कोटींपर्यंत उलाढाल होते. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक शेती बाजारात सुरू होते. परंतु यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यात जवळपास तयार झालेल्या कांद्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यामुळे सोलापूरच्या शेती बाजारात कांद्याची आवक लक्षणीय स्वरूपात घटली आहे. गेल्या ६ नोव्हेंबर रोजी बाजारात २१ हजार ३०४ क्विंटल कांद्याची आवक झाली असता त्याला कमाल ६००० रुपये तर सर्वसाधारण १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. त्यानंतर त्यात कमी-अधिक बदल होऊन काल सोमवारी १८ हजार ८२ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला कमाल दर तब्बल ७५०० रुपये तर सर्वसाधारण दर ३५०० रुपये मिळाला होता. मंगळवारी दुसऱ्या दिवशी १७ हजार ६४३ क्विंटल कांद्याची आवक झाली असता कमाल दर ६५०० रुपये तर सर्वसाधारण दर २५०० रुपये इतका देण्यात आला.
गेल्या आठवडाभरात कांद्याचा कमाल दर ५६०० रुपये ते ७५०० रुपयांपर्यंत मिळाला असून येत्या काही दिवसांत कांद्याची आवक वाढेपर्यंत कांदा दराची स्थिती अशीच राहण्याची चिन्हे आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये शेती बाजारात आवक होणाऱ्या कांद्याला साधारणत: तीन हजार ते पाच हजारांपर्यंत दर मिळतो. त्यात दराने आणखी उसळी घेऊन आता कांद्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे.
