Anand Dave on CJI Bhushan Gavai: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वकिलाचे प्रयत्न हाणून पाडले गेले. मात्र या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली. सरन्यायाधीश गवई यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रकरणाची सुनावणी घेत असताना प्रभू विष्णूच्या मूर्तीवरून याचिकाकर्त्यांना सुनावले होते. या विधानाचा राग आल्यामुळे आपण बूट फेकण्याची कृती केल्याचे सदर वकिलाने सांगितले. गवई यांच्या त्या विधानाचा आता हिंदू संघटनांच्या वतीनेही निषेध करण्यात येत आहे.
पुण्यातील हिंदू महासंघानेही सरन्यायाधीश भूषण गवईंच्या देवाबद्दलच्या विधानाचा निषेध केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कृत्याचाही धिक्कार केला आहे. काहीही झाले तरी न्यायमूर्तींना अशी वागणूक देणे चुकीचे आहे, असे हिंदू महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी सांगितले.
आनंद दवे यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबरोबर घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, हे पहिल्यांदा नमूद करतो. पण सर्वोच्च न्यायालय हे सामान्य व्यक्तीचे न्याय मिळवण्याचे शेवटचे स्थान आहे. आमच्या सणावर बंधने आल्यानंतर आम्ही न्यायालयात जातो. आमच्याकडे येऊ नका, असे न्यायालयाने आजवर कधीही सांगितलेले नाही.
देवांचा ऐकेरी उल्लेख आम्हाला आवडला नाही
आनंद दवे पुढे म्हणाले, “न्यायालयाचा याचिका फेटाळण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण आमच्याकडे न येता तुम्ही भगवान विष्णूकडे जा, असे सांगणे चुकीचे आहे. न्यायालयाकडून अशी विधाने कधी झालेली नाहीत. त्यामुळे गवई यांचे विधान आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक होते. आमच्या देवांचा ऐकेरी उल्लेख आम्हाला आवडला नाही. त्यादिवशी देवाची एकप्रकारे टिंगलच झाली.”
भाजपाने पेरलेल्या विषामुळं सरन्यायाधीशांवर झाला हल्ला
वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर माफी मागणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यावर बोलताना आनंद दवे म्हणाले की, चूक ती चूकच असते. सरन्यायाधीशांना कदाचित त्यांची चूक मान्य असेल म्हणून त्यांनी गुन्हा दाखल न करता या प्रकरणात आवरते घेतले. त्याचप्रमाणे वकील राकेश किशोर यांनीही माफी मागायला हरकत नाही.

मुळात मागच्या दहा वर्षांत भाजपाने धर्माची अफूची गोळी लोकांना दिली आहे. काहीही झाले तरी लोकांच्या भावना दुखावतात, हेही आक्षेपार्ह आहे. भाजपाने पेरलेल्या विषाला आता फळे यायला लागली आहेत. भाजपाने हिंदूंसाठी काहीही न केलेले नाही, रोजगार, उद्योगधंदे, वाढते कर्ज याविषयी ते काहीही बोलत नाहीत. भाजपा जर हिंदुत्ववादी आहे तर सरन्यायाधीश गवईंचे विधान चुकीचे होते, हे का सांगत नाही? असा प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केला.