हिंगोली : जिल्ह्यात जूनमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. कळमनुरी व वसमत तालुक्यात एक हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपईसह इतर पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५.७७ कोटी रुपयाची मागणी नोंदवली. मात्र, अद्याप दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना मदतीचा एक रुपयाही मिळाला नाही. आता ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीने शेतातील पिके होत्याची नव्हती झाली. परिणामी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असून मदत कधी मिळणार, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे.

जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात ९ व १० जूनला झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वारंगा, जवळा पांचाळ, रेडगाव वडगाव, वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगावसह जिल्ह्याच्या अनेक गावांतील केळी, पपईसह एक हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. कळमनुरी तालुक्यात एक हजार ४९ हेक्टर, तर वसमतमधील ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यात जिल्हाभर अतिवृष्टी झाली. नद्या, ओढे नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये नदी, ओढ्याकाठची जमीन पिकासह खरडून वाहून गेली. जिल्ह्यातील धरणे, सिंचन तलाव पाण्याने तुडुंब भरले.

अनेक भागांतील शेतात पाणी साचल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, हळदीसह इतर खरीप पिकाचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने पीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पत्रकारांच्या बैठकीत व्यक्त केला होता.

माझ्या सहा एकरवरील केळीचे जून महिन्यामध्ये मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल पाठवला. मात्र अद्याप मदत मिळाली नाही. आता परत ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने माझ्या चार एकर क्षेत्रावरील हळद, सोयाबीन, केळीच्या रोपांचे मोठे नुकसान झाले. शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी. – रवी अडकिने, शेतकरी, डोंगरकडा.

जूनमध्ये झालेल्या अवकाळी पावसात आपल्या दहा एकरवरील केळीचे पूर्णतः नुकसान झाले. महसूल प्रशासनाने पीक नुकसानीचे पंचनामे केले. लवकरच आर्थिक मदत मिळेल असे सांगितले. मात्र अद्याप शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत मिळाली नाही. – प्रकाश बावगे, शेतकरी, हिवरा.