करोनाच्या पार्श्वभूमीवर औंढा नागनाथ देवस्थानच्या वतीने नगर परिषद कळमनुरीला गरीब,कष्टकरी , मजूर व गरजूंना वाटप करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूं अन्नधान्याच्या ५०० किट् दिल्या होत्या. त्या परस्पर लांबविल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून झालेल्या चौकशीत सत्यता पुढे आली,पोलिसातील तक्रारीनंतरही कार्यवाही न झाल्यामुळे हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले होते.आता न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी.कुलकर्णी यांनी कळमनुरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याबाबत काय कार्यवाही केली अशी विचारणा करून सरकारी वकिलामार्फत चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचेआदेश केल्यानंतर आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कळमनुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून नगराध्यक्ष उत्तम शिंदे सह १२ नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औंढा नागनाथ देवस्थानच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी नगरपालिकेला जीवना वश्यक वस्तूच्या ५०० कीट्स दि. २३ एप्रिल रोजी गरिबांना वाटप करण्यासाठी दिल्या होत्या. परंतु नगर परिषदचे नगराध्यक्ष उत्तम शिंदे सह १२ नगरसेवकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यावर दबाव टाकून त्या परस्पर वाहनाद्वारे लांबवल्या बाबत नंदकिशोर तोष्णीवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल. सदर प्रकरणी चौकशी करून दोशी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

तक्रार प्राप्त होताचजिल्हाधिकाऱ्यांनी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना २५ एप्रिल रोजी सदर प्रकरणात चौकशी व पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. खेडेकर यांनी सदर प्रकरणात २७ एप्रिल रोजी चौकशी निमित्ताने सुनावणी ठेवली. यामध्ये त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून चौकशी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. त्यामध्ये तक्रारीत सत्यता असल्याचे नमूद करून संबंधित दोषी विरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश व्हावेत असा अभिप्राय अहवालात नोंदवला होता.

परंतु या प्रकरणात गुन्हे दाखल होत नसल्याने तोष्णीवाल यांनी ५ जून रोजी कळमनुरी पोलिसात तक्रार करून संबंधितां विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याउपरही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने तोष्णीवाल यांनी शेवटी औरंगाबाद खंडपीठात दिं.३ जुलै २०२० रोजी ॲड.बालाजी शिंदे यांचे मार्फत दाद मागीतली असतांना न्याय्यालयाने कळमनुरी पोलीसात दि.५ जून रोजीच्या तक्रारीवर काय कार्यवाही केली याचा अहवाल चार आठवड्यात सादर करावा असे आदेशात नमूद केले होते.

…अखेर कळमनुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी कळमनुरी पोलिसात दि.६ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरूनऔंढा नागनाथ देवस्थानच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांना वाटप करण्यासाठी दिलेल्या ५०० किट परस्पर लांबविण्याच्या आरोपाखाली नगराध्यक्ष उत्तम शिंदे, नगरसेवक चंद्रकांत देशमुख, रत्नमाला कऱ्हाळे, आप्पाराव शिंदे, मीरा डुरे, सुमन बेंद्रे, राजू संगेकर, शकुंतला बुर्से, पार्वतीबाई पारवे, संतोष रामेश्वर सारडा, सविता सोनुने, व शेख सईदा मुसा यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hingoli kalnaber corporator fir coronavirus nck
First published on: 08-08-2020 at 14:25 IST