प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : आरोग्य, शिक्षणाच्या दृष्टीने प्रगत म्हणून अकोला जिल्हा गत काही वर्षांमध्ये प्रकर्षांने समोर आला. शहरातील नागरिकांचे राहणीमानदेखील उंचावले. मात्र, धावपट्टीच्या विस्तारीकरणामुळे रखडलेला विमानतळाचा प्रश्न व मूलभूत सुविधांअभावी जिल्ह्यात अपेक्षित औद्योगिक विकास झालेला नाही. रोजगारासाठी उच्चशिक्षित तरुणाईचे स्थलांतर होते. जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची गरज आहे.

अकोल्याची ‘कॉटन सिटी’ म्हणून असलेली ओळख आता खासगी रुग्णालय व शिकवणी वर्गाचे शहर म्हणून होत आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम, लघु व सूक्ष्म मिळून एक हजार ६७० उद्योग आहेत. पाच वर्षांत उद्योगांमध्ये वाढ झाली. काही उद्योग बंददेखील पडले. औद्योगिक वसाहतीतील ऑइल, दाल मिलमधून डाळ व तेलाचा देशभरात पुरवठा होतो. औषधी, कृषी उद्योग, कीटकनाशके, साबण, खाद्यपदार्थ, फर्निचर आदी उद्योग आहेत. जिल्ह्यात रोजगाराच्या किरकोळ संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या नोकरीसाठी मुंबई, पुणेसारख्या शहरात स्थलांतरित व्हावे लागते. जिल्ह्यात व्यापक स्वरूपात रोजगारनिर्मिती होण्याची गरज आहे. मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेमार्गावर अकोला जंक्शन रेल्वे स्थानक, जिल्ह्यात जाणारे राष्ट्रीय महामार्ग आदी उद्योग वाढीसाठी पोषक आहे. मात्र, विमानसेवेचा अभाव औद्योगिक विकासासाठी मारक ठरतो. ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराचा प्रश्न गेल्या दीड दशकांपासून रखडलेला आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या ‘टेकऑफ’ला विमान सेवेची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा >>> दारूडा आणि नरेंद्र मोदींची वृत्ती एकच, प्रकाश आंबेडकर यांची टीका

आरोग्य सुविधेत वाढ असून सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयासह शहरात अतिविशेषोपचार रुग्णालय उभारले गेले. खासगी वैद्यकीय क्षेत्रात ‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयांचे जाळे असले खर्च जास्त आहे.

कृषी प्रक्रिया उद्योगाला वाव

अकोला जिल्ह्यात कापूस ते कापड निर्मितीचा मोठा उद्योग नसल्याने कापूस बाहेर पाठवला जातो. प्रक्रिया उद्योगाचा अभाव, गुलाबी बोंडअळी व वाढत्या उत्पादन खर्चामुळे निम्म्यावर शेतकरी सोयाबीनकडे वळले. जिल्ह्यात विविध कृषी उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला वाव आहे.