हिंगोली : शहराच्या इतिहासात लोकप्रतिनिधींनी दिवाळीच्या निमित्ताने मतदारांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना मिठाईचे डब्बे, अन्नधान्याच्या पेट्या, मुलांना कपडे, महिलांना साड्या अशा भेटवस्तू दिल्या आहेत, असे चित्र आजपर्यंत कधी पाहायला मिळाले नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काही लोकप्रतिनिधींकडून मतदार राजाच्या भेटी घेऊन त्यांना भेटवस्तूही दिल्या जात आहेत.

शिवसेना (शिंदे) आमदार संतोष बांगर व भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडून प्रतिष्ठा पणाला लावून भेटी-गाठींवर जोर असून, दोघांचेही ‘लक्ष्य’ हिंगोलीचे नगराध्यक्षपद कुटुंबात किंवा पक्षाला मिळवून द्यावे, यासाठी एकप्रकारे अहमहमिका सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हिंगोलीत निवडणुकांचे वेध लागल्यापासून महायुतीचे तिन्ही घटक पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आता दोन्ही पक्षांची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे नेमके काय चालले, हे समजणे कठीण झाले असले तरी आगामी निवडणुका जिंकण्यासाठी या तीन पक्षांची युती होऊन, जिल्हा समन्वयक प्रमुखपदी माजी मंत्री दांडेगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्व निवडणुका व हल्लीच्या परिस्थितीत फार मोठे बदल घडले आहेत. काँग्रेस, भाजपामध्ये फूट पडली नसली तरी काँग्रेसचे अनेक मातब्बर पक्षातून बाहेर पडले आहेत.

गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित शिवसेना व भाजप युती असताना हिंगोली नगरपालिका भाजपच्या ताब्यात आली खरी, पण ३२ पैकी केवळ तीन सदस्य भाजपाचे तर एकत्रित शिवसेनेचे सहा सदस्य निवडून आले होते. एकत्रित राष्ट्रवादी पक्ष व काँग्रेसमध्ये निवडणूक आघाडी झाली नव्हती. या दोन्ही पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १४ व काँग्रेसचे ६ नगरसेवक सभागृहात होते.

जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत ५२ सदस्यांपैकी एकत्रित शिवसेना १५, भाजपा १०, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी १२, तर अपक्ष तीन सदस्य निवडून आले होते. अध्यक्षपदासाठी भाजप सेनेला दोन, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला तीन सदस्यांची गरज होती. अपक्ष तीन सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत येण्यासाठी सभापतिपदाच्या मागणीवर आडून राहिल्याने, दरम्यान माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व भाऊ पाटील गोरेगावकर यांनी रात्रीच खेळ केला. अन् शिवसेनेला अध्यक्षपद देऊन सत्ता स्थापन केली. भाजपला सत्तेबाहेरच राहावे लागले होते.

आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. हिंगोली नगरपालिकेवर भाजपला सत्ता हवी आहे. तर शिवसेना शिंदे गटाला पालिका काबीज करायची आहे. याच ईर्षेतून आमदार संतोष बांगर व आमदार मुटकुळे यांच्या भेटी-गाठींची एक प्रकारे स्पर्धाच लागली आहे. आमदार बांगर यांना त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नीला अध्यक्षपद मिळवून द्यायचे आहे. तर भाजपला हिंगोली नगराध्यक्षपद हवे आहे. सोबतच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आमदार मुटकुळे हे चिरंजीव शिवाजी मुटकुळे यांना बसवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.