हिंगोली तालुक्यातील पारडा येथील खून प्रकरणात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला हिंगोली पोलिसांना आठ वर्षानंतर पुणे जिल्ह्यातील लवनवाडी येथून ताब्यात घेण्यात यश आलं  आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील पारडा येथील विठ्ठल आप्पा तोडकर यांचा सन २००७ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हिंगोली न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यामध्ये बबन उर्फ उत्तम केशव मस्के यांचा समावेश होता. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर बबन मस्के व अन्य एकास औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवाना करण्यात आले होते.

दरम्यान २०१३ मध्ये बबन मस्के हा एक महिन्याचा पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आला होता. मात्र त्यानंतर तो कारागृहात परतलाच नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने बबनचा शोध सुरू केला होता. त्यावरून पोलिसांचे पथक नाशिक येथे शोधासाठी गेले होते मात्र त्याठिकाणी मिळालेल्या माहितीनंतर तो पुणे जिल्ह्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी घेतलेल्या माहितीनंतर बबन हा पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीस ठाण्यांतर्गत लवणवाडी गावात मजुरीचे काम करून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तातडीने पुणे जिल्ह्यातील लवणवाडी येथे जाऊन माहिती घेतली. तेव्हा तिथं बबन मस्के हा जगन्नाथ काकडे या नावाने राहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी  रात्री त्याच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. तिथून त्याला हिंगोली येथे आणण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर परत या आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.