हिंगोली : अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी न केल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. अनेक प्रश्न प्रलंबित असतानाही लक्ष न देणाऱ्या पालकमंत्र्यांना बदला, अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त बुधवारी झिरवळ यांच्या हस्ते हिंगोली येथे ध्वजारोहण होणार आहे. एरवी झिरवळ दौरा करत नसल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेष, रखडलेला लिगो प्रकल्प, कयाधू नदीचे पाणी ईसापूर धरणात वळविण्याच्या प्रयत्नांवर शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. वसमत व कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. असे महत्त्वाचे प्रश्न असतानाही पालकमंत्र्याचे म्हणावे तसे लक्ष नाही, अशी टीका खासदार आष्टीकर यांनी केली आहे. ९ व १० जूनला अवकाळी पावसामुळे केळी व पपई पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असूनही त्याची पाहणी पालकमंत्र्यांनी केली नाही. त्यामुळे हे पालकमंत्रीच नको, अशी भूमिका आष्टीकर यांनी व्यक्त केली आहे.
झिरवळ यांनी पालकमंत्री म्हणून आपणास हिंगोलीसारखा ‘गरीब जिल्हा दिला’ अशी नाराजी व्यक्त केली होती. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठका त्यांनी ऑनलाईन घेतल्या. पालकमंत्री जिल्ह्यात फारसे येत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने विरोधक टीका करू लागले आहेत. मात्र, उद्या ध्वजारोहणानंतर शिवाजीराव देशमुख सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर हिंगोली, नर्सी नामदेव, पुसेगाव व सेनगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना ते भेट देणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या शिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रालाही ते भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.