सातारा : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा अभ्यास करत असताना फलटणचे अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना एका जुन्या विहिरीमध्ये मराठा धोप प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर ऐतिहासिक वस्तू सापडल्या. ‘इंडियन आर्म्स ॲक्ट’नंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून नष्ट केली. त्यातून वाचलेली शस्त्रे अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहेत. मराठ्यांनी युद्धनीती व शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून धोप या प्रकारच्या तलवारी बनवल्या. या तलवारींसाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीची पाते वापरत असल्यामुळे यांना फिरंगी देखील म्हणत असत. हे पोलाद उत्कृष्ट दर्जाचे असे. या तलवारींचे दोन उपप्रकार आहेत. पहिला प्रकार वक्र धोप असून, त्याचे पाते, टोकाचा भाग थोडा वक्र असतो. दुसरा सरळ धोप असून, त्याचे पाते सरळ असते.

क्षेत्र महाबळेश्वर येथे सापडलेली ही ऐतिहासिक ठेव दुर्मीळ आहे, हे लक्षात येताच राहुल कदम यांनी याची माहिती गावातील काही प्रमुख व्यक्तींना दिली. धनेश वाडेकर यांनी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्यासह सातारा युवाराज्य फाउंडेशन अध्यक्ष महारुद्र तिकुंडे, सुभाष गायकवाड, रोहन ढाणे यांचे पथक श्री क्षेत्र महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या साह्याने जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून बाहेर काढल्या. यावेळी धनेश वाडेकर, प्रशांत कात्रट, नीलेश धनावडे, आनंद ढेबे, महेश लांगी, संकेत लांगी आदी स्थानिक उपस्थित होते.

क्षेत्र महाबळेश्वर येथे सापडलेली ही ऐतिहासिक ठेव दुर्मीळ आहे, अशा ऐतिहासिक वस्तूंच्या माध्यमातून इतिहासाची अनेक दडलेली पाने उघडली जाऊ शकतात.- प्रवीण शिंदे, अभिरक्षक छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा