scorecardresearch

फडणवीसांच्या आरोपांनंतर सरकारी वकिलांचा राजीनामा; स्टिंग ऑपरेशनचा तपास CID कडे सोपवल्याची गृहमंत्र्यांची माहिती

सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यामार्फत भाजपा नेत्यांना विविध प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते

dilip walse patil informed that the investigation of Devendra Fadnavis sting operation case has been handed over to CID
(संग्रहित छायाचित्र)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनसंदर्भात खुलासा केला होता. ‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह दिला होता. यामध्ये त्यांनी थेट विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांच्यावर देखील फडणवीसांनी गंभीर आरोप केले होते. प्रविण चव्हाण यांच्यामार्फत भाजपा नेत्यांना विविध प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेत याचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे.

“देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आपण करणार आहोत. या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी आपल्या वकिलपत्राचा राजीनामा दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास सीआयडीकडे सोपवण्यात येत आहे. त्यातून वस्तुस्थिती बाहेर येईल अशी मला अपेक्षा आहे, अशी मला आशा आहे,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

हे प्रकरण सीबीआयकडे न दिल्यास आम्ही कोर्टात जावू – देवेंद्र फडणवीस

“पेन ड्राईव्हमध्ये गिरीश महाजनांना कसे फसवायचे याचा व्हिडीओ आहे. पुरावे तयार करण्याचे काम सरकारी वकिलांचे आहे का?  हे प्रकरण तुम्ही गांभीर्याने घ्या अशी माझी अपेक्षा होती. पण मला तसे वाटत नाही. सरकारच्या खाली असलेले पोलीस दल या प्रकरणाची चौकशी करु शकेल अशी अपेक्षा आम्ही करायची? सीआयडी याची चौकशी करु शकत नाही. पुरावे दिल्यानंतरही राज्य सरकार याची चौकशी करत नाही. म्हणून हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची आमची मागणी आहे. तसे न झाल्यास आम्ही कोर्टात जावू,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आपल्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करत पोलीस खात्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना फडणवीस यांनी सभागृहाचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना पेन ड्राईव्ह सुपूर्द केला. माजी मुख्यमंत्र्यांनी दावा केला की पेन ड्राईव्हमध्ये १२५ तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, ज्यामध्ये पोलीस आणि महाविकास आघाडीचे सदस्य भाजपाच्या नेत्यांना अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात कट रचत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hm dilip walse patil informed that the investigation of devendra fadnavis sting operation case has been handed over to cid abn