महाराष्ट्रात ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अटक केली आहे. आज त्यांना १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सदानंद कदम यांना हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी ईडीच्या वकिलांनी त्यांनी १४ दिवसांची कोठडी मागितली. ज्यानंतर कोर्टाने त्यांना १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे कोर्टात ईडीच्या वकिलांनीही अनिल परब यांचं नाव घेतलं.

अनिल परब यांच्यावर काय आरोप?

अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या माध्यमातून विभास साठेंना ८० लाख रुपये दिले, असा दावा ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. तसेच बंगल्यांना रिसॉर्टमध्ये बदलण्याचा निर्णय अनिल परब यांनी घेतला, असं ईडीने कोर्टात म्हटलं आहे. विशेष म्हणजे ईडीने या प्रकरणाच्या तपासासाठी सदानंद कदम यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण सदानंद कदम यांच्या वकिलांनी या कारवाईला चांगलाच विरोध केला. ईडीने केलेली कारवाई कशाप्रकारे चुकीची आहे, असा युक्तिवाद सदानंद कदम यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तर दुसरीकडे ईडीकडूनही जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अखेर कोर्टाने संदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

सदानंद कदम यांच्या वकिलांनी काय म्हटलं आहे?

आमचं म्हणणं असं होतं की सदानंद कदम यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे . ईडी म्हणणं असं होतं की आम्हाला चौकशी करण्याची गरज आहे . दोघांचं म्हणणं ऐकून कोर्टाने १५ मार्च पर्यंतची कस्टडी दिली आहे. त्यांना घरातून जेवण आणि मेडिकल प्रोव्हाइड केली जाईल. त्यांची चौकशी केली जाईल तेव्हा ऍडव्होकेट त्यांच्यासोबत हजर राहू शकतो ही सुद्धा कोर्टाने परवानगी दिली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर तुम्हाला त्यांची उत्तर नक्कीच मिळतील असं सदानंद कदम यांचे वकील निरंजन मुंगधी यांनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीने कोर्टात नेमकं काय म्हटलं?

अनिल परब यांच्या सांगण्यावरुन सदानंद कदम यांनी विभास साठे यांच्यासोबत 80 लाखांचा व्यवहार केला. जवळपास 54 लाखात साई रिसॉर्टची बांधणी करण्यात आली. पण ऑन रेकॉर्ड त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे हे सगळे पैसे नेमके कुठून आले? याचा तपास आम्हाला करायचा आहे. काही साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. या सगळ्या प्रकारामध्ये खोलवर जाऊन तपास करायचा आहे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.