अलिबाग / लोणावळा / सातारा : सर्वत्र नाताळ आणि नववर्ष स्वागताचा उत्साह असताना मुंबईकरांची पावले पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. बुधवारी सकाळपासूनच अनेक पर्यटक खासगी गाड्या घेऊन महाबळेश्वर, कोकण-गोव्याकडे निघाल्यामुळे शहराबाहेर पडणाऱ्या सर्वच महामार्गांवर दिवसभर वाहतूक कोंडी होती. पहाटेपासूनच मुंबईहून पर्यटक लोणावळ्याकडे निघाल्याने द्रुतगती महामार्गाच्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी कोंडी झाली होती. खंडाळा घाटात वाहनांच्या दहा ते बारा किलोमीटर लांब रांगा लागल्या. पुण्यानंतर थेट साताऱ्यापर्यंत ही कोंडी कायम होती. तर कोकणात निघालेल्या पर्यटकांमुळे गोवा महामार्गावरही असेच चित्र होते.

हेही वाचा >>> खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळपासूनच वाहने दाखल झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने खंडाळा बोगद्याजवळ थांबविली व पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा मार्गिका खुल्या केल्या. मात्र या उपाययोजनाही अपुऱ्या ठरत होत्या. खंडाळा घाटात अमृतांजन पूल ते अंडा पॉइंट, खालापूर टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सात-आठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक-दीड तास लागत होता. घाटात इंजिन गरम होऊन वाहने बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. कोकणासह पाचगणी-महाबळेश्वर, कोल्हापूरकडे निघालेल्या पर्यटकांमुळे पुणे-सातारा महामार्गावरही बुधवारी जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. खंबाटकी घाटातही अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती. टोल नाके, घाटमार्ग, महाबळेश्वर फाटा, पाचगणी व महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड, माणगाव, इंदापूर पट्ट्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने या वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडत होती. कोलाड, नागोठणे परिसरात सुरू असलेली कामे वाहतुकीला अडसर ठरत होती. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने वाहतुकीचे नियमन करण्यात पोलीस अपयशी ठरत होते. वडखळ अलिबाग राष्ट्रीय महामार्गावर शहाबाज ते पोयनाड आणि खंडाळे ते अलिबाग दरम्यान वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचे आवाहन

नाताळ ते नववर्षादरम्यान मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात. पर्यटकांनी वेळेचे नियोजन करून बाहेर पडावे. त्यामुळे कोंडीत अडकावे लागणार नाही. वाहन चालकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होईल. चुकीच्या पद्धतीने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.