कर्नाटकमधील हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद देशातही अनेक ठिकाणी उमटत आहेत. अनेक ठिकाणी या मुलींना पाठिंबा देण्यासाठी लोक एकत्र जमू लागले आहे. तर, कर्नाटक सरकारने वाढता वाद पाहता शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. तर, कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाबवरून सुरू असलेल्या गदारोळाचे महाराष्ट्रातही पडसाद उमटू लागले आहे. त्यामुळे या विषयाला महत्व न देण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hijab Row: कर्नाटकमधल्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सह्यांची मोहीम

“कर्नाटकात हिज़ाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे.” असं ट्वीट करत दिलीप वाळसे पाटलांनी माध्यमांना टॅग केलंय आणि या विषयाला महत्व न देण्याचं आवाहन केलंय.

“माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये,” असंही त्यांनी म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister dilip valse patil reaction on hijab row hrc
First published on: 09-02-2022 at 10:19 IST