राज्यातील प्रमुख पाच घोडेबाजारांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अकलूज येथील घोडेबाजारास प्रारंभ झाला. या बाजारात देशभरातून एक हजारांपेक्षा अधिक जातिवंत घोडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यात दुपटीने वाढ होण्याची अपेक्षा आहे. पंचकल्याणी, अबलकी, काठेवाड, मारवाड अशा जातिवंत घोडय़ांच्या अनोख्या सौंदर्यासह त्यांची गुणवैशिष्टय़े पाहावयास मिळणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या घोडे बाजारात पहिल्याच दिवशी मारवाड जातीच्या रुबाबदार व कर्तबगार एका घोडय़ाला तब्बल १५ लाखांची खरेदी किंमत सांगण्यात आली आहे.
वेगवेगळ्या जातींचे, रंगांचे, ढंगाचे, रुबाबदार आणि महागडे घोडे पाहायचे असतील तर अकलूज येथील घोडे बाजार प्रसिद्ध ठरले आहे. खरेतर राजकारणात ‘घोडे बाजार’ हा शब्द लोकप्रतिनिधींसाठी वापरला गेला तर तो बदनाम ठरतो. हाच शब्द अकलूजमध्ये आलात तर तो किती यथार्थ आहे, याची खात्री पटते. अकलूजच्या घोडेबाजाराचे यंदाचे नववे वर्ष आहे. अश्वप्रेमींसाठी येथील घोडेबाजार प्रमुख आकर्षण ठरतो. महाराष्ट्रात अकलूजशिवाय सारंगखेडा (जि. नंदूरबाबर), माळेगाव (जि. नांदेड), रहिमतपूर (जि. सातारा) व शिरपूर (जि. धुळे)येथील घोडेबाजार प्रसिद्ध आहेत. सारंगखेडय़ात दत्त यात्रेत घोडेबाजार भरण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. अकलूजमध्ये २००९ पासून कार्तिक महिन्यात घोडेबाजार भरविला जातो. गतवर्षी येथे २१०० घोडे दाखल झाले होते. त्यातून १३०० पेक्षा जास्त घोडय़ांची विक्री होऊन सुमारे सात कोटींची उलाढाल झाली होती. त्या वेळी २६ लाखांस एक जातिवंत घोडा विकला गेला होता.
यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर भरलेल्या घोडेबाजाराचा शुभारंभ अकलूज कृषिउत्पन्न बाजार समितीच्या दहा एकर क्षेत्राच्या बंदिस्त आवारात राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील याच्या हस्ते झाला. या वेळी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार हणमंत डोळस, धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदाच्या घोडेबाजारात पहिल्या दिवशी एक हजारांपर्यंत घोडे घेऊन ६५ व्यापारी दाखल झाले. मागील तीन वर्षे दुष्काळाचा परिणाम गतवर्षीच्या घोडेबाजाराला बसला होता. गेल्या वर्षीची नोटाबंदीचा फटका यंदाच्या घोडेबाजाराला कितपत बसेल, याविषयी तर्कवितर्क व्यक्त होत
आहेत.
बंदिस्त आवार, दोन हजार वृक्षांची सावली, शिवाय पाणी, पशुखाद्याची मुबलक उपलब्धता ही अकलूजच्या घोडेबाजारासाठी घोडे व्यापाऱ्यांना समाधान देणारी असते. शिवाय घोडे खरेदी-विक्री व्यवहारातील चोखपणा, त्यातील पारदर्शकता आणि सुरक्षितता यामुळे घोडे व्यापाऱ्यांसाठी येथील घोडेबाजार अधिक दिलासादायक वाटतो, असे उत्तर प्रदेशातील बरेली येथील घोडे व्यापारी इरफान शेख हे सांगतात. गेली पंधरा वर्षांचा घोडे बाजाराचा अनुभव असलेले इरफान शेख हे यंदा अकलूजमध्ये ४० घोडे विक्रीसाठी घेऊन आले आहेत. हीच भावना मोहम्मद तबरेज (उत्तर प्रदेश) यांनीही व्यक्त केली.
या घोडेबाजारात फेरफटका मारला असता अनेक जातिवंत घोडय़ांची लगबग दिसून आली. मोहम्मद तबरेज यांच्या १३ महिन्यांच्या मारवाड घोडीला सात लाख ५० हजारांचा भाव आला आहे. तर त्यापेक्षा जास्त म्हणजे १५ लाखांचा भाव दुसऱ्या एका मारवाड घोडय़ाला आला आहे. ११ लाखांसही एक घोडा विक्रीस उपलब्ध आहे. आणखी एक घोडा दाखल होत असून त्याची किंमत २६ लाखांपर्यंत जाईल, असे अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.