Kasab Knows Marathi : अजमल आमीर कसाब हे नाव घेतलं की पाकिस्तानच्या दहशतवादाचा क्रूर चेहरा काय असतो ते आपल्याला समोर येतं. २००८ मध्ये २६ नोव्हेंबरच्या दिवशी मुंबईत दहा अतिरेकी शिरले होते. या दहा अतिरेक्यांनी ठिकठिकाणी हल्ले केले आणि शेकडो निरपराध माणसांना मारलं. दहापैकी नऊ अतिरेकी मारले गेले. मात्र दहशतवादी कसाब पकडला गेला. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली. २१ नोव्हेंबर २०१२ च्या सकाळी पुण्यातल्या येरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली. कसाबला मराठी येत होतं हे पोलीस अधिकाऱ्यांना कसं समजलं हा किस्सा आता समोर आला आहे. कसाब ऑर्थर रोड तुरुंगात होता तेव्हा स्वाती साठे तुरुंग अधीक्षक होत्या. त्या कसाबला गाढव म्हणाल्या त्यानंतर ही माहिती समोर आली.
कसाबला मराठी येत होतं हे पोलिसांंना कसं समजलं?
कसाबला मराठी येत होतं. त्याला आर्थर रोडच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. अंडा सेल ही अशी जागा जिथे एका वेळी एकच माणूस राहू शकतो. स्वाती साठे या तुरुंग अधीक्षक होत्या. कसाबच्या अंडा सेलजवळून त्या गेल्या, त्यावेळी तिथे एक हवालदार उभा होता. त्यांनी हवालदाराला विचारलं काय रे तो गाढव (कसाब) बरा आहे ना? त्यावर तो हवालदार म्हणाला हो ठीक आहे. स्वाती साठे निघून गेल्यावर त्या हवालदारावर कसाब चिडला. त्याने विचारलं की त्या मॅडम मला गाढव का म्हणत होत्या? तो हवालदार साठे यांच्याकडे धावला आणि म्हणाला मॅडम त्याला तर मराठी येतं, तुम्ही त्याला गाढव म्हणालात ते त्याला कळलं. त्यावेळी कळलं कसाबला मराठी येतं.
कसाबला मराठी कुणी शिकवलं?
कसाबला मराठी का येत होती? तर २६/११ चा जो हँडलर होता अबू जुंदल त्याचं नाव जबिउद्दीन अन्सारी असं होतं. अबू जुंदल महाराष्ट्रातील बीडचा होता. त्यामुळे त्याला मराठी येत होती. त्याने कसाबला मराठी शिकवलं थोडंसं होतं. तसंच कसाब पोलिसांची चर्चा तुरुंगात ऐकायचा. त्यावरुनही त्याला मराठी भाषा कळत होती. कोर्टात कसाबचा चेहरा वेगळा असायचा. कोर्टात तो विनोद करायचा. मी ज्यावेळी त्याची ट्रायल कव्हर केली होती त्यावेळी मी हे पाहिलं आहे असं गुन्हे वार्तांकन करणारे पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं.
कसाबला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा काय घडलं?
कसाबला फाशीची शिक्षा सुनावली गेली तेव्हाही मी न्यायालयात उपस्थित होतो. त्याने जे काही कृत्य केलं त्याचा त्याला काही पश्चात्ताप नव्हता. कसाबला जी फाशीची शिक्षा झाली त्याची बातमी अचानक समोर आली. ज्या सकाळी कसाबला फाशी देणार तेव्हा माझा मित्र उमेश कुमावतला बातमी मिळाली की कसाबला फाशी होणार आहे. कॅमेरामनलाही सांगितलं नाही, ओबी इंजिनिअरला सांगितलं नाही कुणालाच सांगितलं नाही की काय होणार आहे. कसाबला फाशी झाल्याची बातमी उमेश कुमावतने जेव्हा कॅमेरासमोर सांगितलं तेव्हा त्याच्या कॅमेरामनला पहिल्यांदा कळलं की कसाबला फाशी झाली. जे पोलीस अधिकारी कसाबला पुण्याला घेऊन गेले त्यांचे मोबाइल बंद करण्यात आले होते. पाकिस्तानने दहशतवाद कसा पसरवला याचा कसाब हा धडधडीत पुरावा होता असंही जितेंद्र दीक्षित यांनी सांगितलं आहे.