राज्यातील बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी इंग्रजीची प्रश्नपत्रिका तासाभरातच व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. सोलापूरमधील तांबेवाडीत हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बार्शी तालुक्यातील तांबेवाडीतील वसंत महाविद्यालय बारावीच्या परीक्षेचे केंद्र आहे. परीक्षा सुरु झाल्याच्या तासाभरातच बारावीच्या इंग्रजीच्या ए, बी आणि सी अशा तिन्ही सेक्शनच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्या. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.  प्रश्नपत्रिका व्हायरल कशी झाली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महाविद्यालयात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरुन कॉपी पुरवल्या जात होत्या, असा संशय व्यक्त होत आहे.  महाविद्यालयाजवळील एका टपरीवर ही  प्रश्नपत्रिका उपलब्ध होती, अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, पुणे विभागीय मंडळाचे बबन दहिफळे यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘वसंत महाविद्यालय, तांबेवाडी येथून बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतानाच व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी पाठवले असून त्याबाबतचा अहवाल लगेच देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती दहिफळे यांनी दिली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरु झाली. प्रश्नपत्रिका फुटण्यापासून ते व्हॉट्स अ‍ॅप सारख्या समाजमाध्यमावरून ती व्हायरल होण्यापर्यंत गेल्या काही वर्षांत घडलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल होत असल्याने यंदा नवीन पद्धत राबवली आहे. नव्या नियमानुसार आता पर्यवेक्षकांना २५ विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा असलेले सीलबंद पाकिट देण्यात येणार असून पर्यवेक्षक त्या वर्गात गेल्यानंतर तेथील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन मगच ते पाकिट फोडायचे आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकाफुटीचा धोका यंदापासून टळेल अशी आशा व्यक्त होत होती. मात्र, यानंतरही सोलापूरमध्ये व्हॉट्स अॅपवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc exam 2018 english question paper viral on whats app in solapur
First published on: 21-02-2018 at 13:24 IST