लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याचा परीणाम धरणांतील पाणीसाठ्यावर होता दिसतो आहे. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. २८ धरणांमध्ये ४३.९९ टक्के इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. या पाण्यावर पुढील अडीच महिने कसे काढायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. धरणे शंभर टक्के भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. परंतु, मार्च महिना संपत असताना धरणामधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २८ धरणांत आता केवळ जवळपास ४० टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा पुरवण्यासाठी नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
रायगडमधील पर्जन्यमान यंदा चांगले होते. जिल्हयात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलीमीटर इतका पाऊस बरसतो. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. लघुपाटबंधारे विभागाच्या जिल्हयातील २८ धरणातील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला आहे आता केवळ ४३.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षीही पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्याला बसणार आहेत. उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे असणार आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूडमध्ये १ तळा १, रोहा १, पेण १, अलिबाग १, सुधागड ५, श्रीवर्धन ३, म्हसळा २, महाड ४, कर्जत २, खालापूर ३ ,पनवेल ३ , उरण १ अशी १३ तालुक्यांत २८ लघु पाटबंधारे विभागाचे प्रकल्प आहेत. यामधून जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील या धरणांमध्ये ६८.२६१ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. अनेक धरणे ही ३० ते ४० वर्षापूर्वी बांधण्यात आली आहेत. मातीने बांधण्यात आलेल्या या धरणांना गळती लागली आहे. मात्र, प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गळतीमुळे पाणीसाठा कमी होत असून उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील २८ पैकी १६ धरणक्षेत्रात ५० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात सर्वात जास्त ७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरण क्षेत्रात सर्वात कमी १२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.
धरणातील पाणीसाठा टक्केवारी
फणसाड ४४, वावे – ६५, सुतारवाडी – ६५, आंबेघर – ७८, श्रीगाव – ३३, कोंडगाव – ३५, घोटवडे – २५, ढोकशेत – १३, कवेळे – ३१,उन्हेरे – २३, कार्ले – ५०, कुडकी – ४६, रानवली – १२, पाभरे – ५९, संदेरी – ५८, वरंध – ३५, खिंडवाडी – ३५, कोथुर्डे – २१, खैरे – ३६, साळोख – ३५, अवसरे – ५७, भिलवले – ६४, कलोते मोकाशी – ३२, डोणवत – ४२, मोरबे – ५९, बामणोली – ६१, उसरण – ५८, पुनाडे – ५८