सांगली : कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने कृष्णा-वारणाकाठी पूरस्थिती निर्माण झाली असून आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी वेगाने इशारा रेषेकडे झेपावत आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पूरबाधित क्षेत्रातील १८३ कुटुंबातील ७३७ नागरिकांचे स्थलांतर बुधवारी दुपारपर्यंत करण्यात आले होते. शिराळा तालुक्यातील सहा, वाळवा व पलूस तालुक्यातील प्रत्येकी एक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काठोकाठ भरलेल्या कोयना धरणातून ९५ हजार ३००, चांदोलीतून ३९ हजार ६६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे सांंगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. बुधवारी दुपारी सांगलीतील पाणी पातळी ३६ फूट ६ इंच झाली असून इशारा पातळी ४० फूट आहे. तर ताकारी येथे नदीचे पाणी धोका पातळीवरून साडेसहा फूट वाहत आहे. तर वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने तीरावरील शेकडो एकर जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत.
सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड पटवर्धन कॉलनी आदी ठिकाणच्या लोकांनी स्थलांतर केले आहे. तर मगरमच्छ कॉलनी, काकानगर येथील लोकांनीही आपले कौटुंबिक साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. पाणीपातळी ४० ते ४२ फुटापर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला असल्याने लोकांची स्थलांतरासाठी धावपळ सुरू आहे.
जिल्ह्यातील पूरजन्य स्थितीबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले, महापालिका क्षेत्रातील ९५ कुटुंबातील ४९२, सोनवडे (ता. शिराळा) येथील ३ कुटुंबांतील ९, भिलवडी (ता. पलूस) येथील ७४ कुटुंबांतील १९०, वाळवा तालुक्यातील जुने खेडमधील ९ कुटुंबांतील ३८, गौडवाडीतील २ कुटुंबांतील २ अशा १८३ कुटुंबांतील ७३७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर पूरबाधित क्षेत्रातील १०० हून अधिक जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुराचे पाणी शिरल्याने सांगली व मिरज येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. यामुळे अंत्यविधीसाठी महापालिकेने कुपवाड स्मशानभूमीत व्यवस्था केली आहे.
औदुंबरच्या दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरल्याने श्रींची मूर्ती, पादुका मंगळवारी रात्रीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील बहे, बोरगाव, नागठाणे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ आणि राजापूर (जि. कोल्हापूर) बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच शिराळा तालुक्यातील चरण -सोंडोली, आरळा -शित्तुर, बिळाशी -भेडसगाव, मांगले -सावर्डे, मांगले -कांदे आणि कांदे- सावर्डे हे वारणेवरील पूल पाण्याखाली गेले आहेत, पलूस तालुक्यातील खटाव- नांद्रे, घोगाव- दुधोंडी हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ताकारी पुलावर पाणी आले आहे. यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नदीला आलेला पूर पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून हुल्लडबाजी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सांगलीतील कृष्णा तीरावर, मिरजेतील कृष्णा घाटावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला असून एखादी पावसाची सर वगळता पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. दुपारी काही काळ सूर्यदर्शनही सांगलीकरांना झाले. आज सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात ३४.२ मिलीमीटर झाला असल्याची माहिती पूरनियंत्रण कक्षातून देण्यात आली.