झोपडपट्टी धारकांविषयी जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तो चांगला आहे. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आता झोपडी विकण्यासंबंधीचाही निर्णय त्यांनी घ्यावा अशी मी विनंती त्यांना करतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी टोलाही लगावला आहे. नालेसफाई आणि कचरा हे ठाण्यातल्या सत्ताधाऱ्यांचं खाण्याचं कुरण आहे. ते कचराही खातात आणि नाल्यातूनही पैसा खातात असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
अनंत करमुसे मारहाण प्रकरणी काय म्हणाले आव्हाड?
मुख्य न्यायालयाने नाकारले मग तो माणूस सर्वोच्च न्यायालयात गेला, सर्वोच्च न्यायालयात त्याचे वकील कोण कोण होते यांची यादी काढा मग तुम्हाला समजेल हा पैसा कुठून आला, जो अधिकारी चौकशी करत होता त्या अधिकाऱ्याची पोस्टिंग कुठे कुठे होते ते बघा, म्हणजे एका राजकीय पक्षाच्या ताटाखालचं मांजर असलेला अधिकारी चौकशी करत होता. चौथी चार्जशीट दाखल झाली आहे. काल मी अचानकच एक मेडिकल सर्टिफिकेट पाहिलं. ते इतके दिवस कुठे होतं? हे आश्चर्याचंच आहे. इतके दिवस कुठे होतं हे सर्टिफिकेट? मी असल्या केसेसना घाबरत नाही. मुख्यमंत्री कामाला लागतात. मला संपवण्यासाठी इतक्या करामती मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत त्यामुळे मी खुश आहे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मला फसवण्याचे १०० प्रयत्न केले जातील पण मी गप्प बसणार नाही
मला फसवण्याचे १०० प्रयत्न करतील. पण मी गप्प बसणाऱ्यांमधला माणूस नाही. ज्या कोर्टाने सांगितलं की एकनाथ शिंदे यांची निवड अवैध आहे, त्यांची मुख्यमंत्रीपदाची निवडच अवैध आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. यांच्याकडे नैतिकता उरलेली नाही. ती कुणाकडे होती तर उद्धव ठाकरेंकडे. त्यांनी हे सांगितलं की माझी माणसंच निघून गेली आहेत तर मी कशाला मुख्यमंत्री राहू? त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं. इथे सर्वोच्च न्यायलायने सांगितलं आहे की एकनाथ शिंदे यांची निवड अवैध आहे तरीही ते पद सोडत नाहीत असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.