“मी बाळासाहेबांना तेव्हाच शब्द दिला होता की….”, नारायण राणेंचा मोठा खुलासा!

“मी माझ्या कर्तृत्वाने जे काय घडलो आहे, त्यात तुम्हाला काय राग?” असा सवालही केला आहे.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेना यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या नव्या वादाची आता दिवसेंदिवस नवीन रूप पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहेत. तर, यातूनच अनेक गौप्यस्फोट होतानाही दिसत आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना जवळून पाहिलेली असल्याने, ते देखील जुन्या गोष्टी, घटना यावरून शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहेत. तर, शिवसेनेच्या नेत्यांकडून नारायण राणेंना विविध मुद्द्यांवरून लक्ष्य केले जात असल्याचं दिसत आहे. राणे भाजपात गेल्यापासून व भाजपा-शिवसेना युती तुटल्यापासून तर या घटना अधिकच घडत आहेत. त्यात आता नारायण राणेंना भाजपाकडून केंद्रीयमंत्री पद दिल्या गेल्याने, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालेली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर या वादात अधिकच भर पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक मोठा खुलासा केल्याचं दिसून आलं आहे.

बाळासाहेब गेले अन् ठाकरे भाषा तिथेच संपली; कुणीही आव आणू नका – नारायण राणे

नारायण राणेंनी म्हटलं की, “माझा वैयक्तिक राग अजिबात नाही आणि मी बाळासाहेबांना तेव्हाच शब्द दिला होता की, माझ्यापासून ठाकरे कुटुंबाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. याची मी खबरदारी घेईन, तुम्ही काळजी करू नका. हा माझा त्यांनी शब्द घेतला.” असं त्यांनी सांगितलं आहे.

…मी त्यांना सांगू इच्छितो मवाळपणा माझ्या रक्तात नाही – नारायण राणे

तसेच, “पण आता हे उठसूठ नारायण राणे… नारायण राणे बोलल्यावर? माझं देखील वृत्तपत्र आहे आणि लवकरच चॅनल देखील येईल. मग आम्ही सकाळ संध्याकाळ दाखवतो, लोकं काय म्हणणार की यांना चांगलं काही दाखवता येत नाही. राज्यातील, देशातील काही प्रश्न नाही दाखवता येत, सांगता येत. नुसतं एकाच्याच विरोधात लागणं. अरे पण मी तुमचं काय घेऊन आलेलो नाही. मी माझ्या कर्तृत्वाने जे काय घडलो आहे, त्यात तुम्हाला काय राग?. तुम्हाला उलट वाटलं पाहिजे की या माणसाने शिवसेनेसाठी फार केलेलं आहे. असं का वाटत नाही.” असंही यापुढे बोलताना नारायण राणेंनी बोलून दाखवलं आहे.

मला डिवचलं तर मी कधीच गप्प बसणार नाही –

याचबरोबर, “बाळासाहेबांनी ज्या हेतूने माझ्याकडून शब्द घेतला, ते मी स्पष्ट करू शकत नाही. पण मी कधीही हे सगळं सुरू व्हायच्या अगोदर, आदित्यवर कधी बोललो नाही. उद्धवजींवर कधी बोललो नाही. त्यांनी हे सुरू केलं आणि त्यांनी म्हणण्यापेक्षा संजय राऊतच्या माध्यमातून सुरू झालं, म्हणून उत्तर द्यायचं माझं काम आहे. मी ऐकून घेणाऱ्या पैकी नाही. मला डिवचलं तर मी कधीच गप्प बसणार नाही आणि त्यांनी खरं म्हणजे विषय बंद करावेत. आमची काय चौकशी करा, रमेश मोरेचीही करा, त्या हत्येमागे कोण होतं, जया जाधवचीही करा, हत्या होण्यामागे काय कारण आहेत?. कोणी ही सुपारी दिली होती?. या सगळ्या चौकशा व्हायला पाहिजेत. आज नाही तर उद्या सगळ्या गोष्टी नक्कीच बाहेर येतील.” असंही यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I had given the word to balasaheb then narayan rane msr