केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रायगडच्या महाड येथे माध्यमांशी बोलताना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना,केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशा ढवळून निघालं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद कोकणापासून ते दिल्लीपर्यंत दिसून आले. शिवनसेनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. शिवाय, राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली व मात्र त्यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खास शैलीत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी, “आपण कारवाईनंतर मवाळ झालोय असं काहीजण म्हणत आहेत, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मवाळपणा माझ्या रक्ततात नाही, आपल्या जीवाची पर्वा न करता, समोरच्यावर तुटून पडणं हा माझा स्वभाव गुणच आहे.” असं देखील बोलून दाखवलं.

“मी बाळासाहेबांना तेव्हाच शब्द दिला होता की….”, नारायण राणेंचा मोठा खुलासा!

नारायण राणे म्हणाले, “माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, शिवसेनेत असतानाही आले विरोधकांकडून आणि आता शिवसेना सोडल्यावर शिवसेनेकडून असे अनेक प्रकार घडता आहेत. मी कधी खचून वैगरे जात नाही. माझं खच्चीकरण मी होऊ देत नाही. म्हणून प्रत्येकाला तेव्हाही अगदी घटना घडायच्या अगोदरही मी लोकांना भेटत होतो. लोकं मला भेटत होते, लोकांचा प्रतिसाद उत्तम होता आणि त्यानंतरही मी कोकणात आलो, कोकणातील जनतेकडून एवढ्या मोठ्याप्रमाणावर मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलोय. कणकवली व काल सावंतवाडीत रात्री १२ वाजता देखील, हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित होती. रात्रीचे १२ वाजले तरी देखील ते मैदान पूर्णपणे भरलेलं होतं. याचाच अर्थ जनतेचं प्रेम किती आहे. जनता मला कशाप्रकारे प्रतिसाद देते आहे, हे कळतं आणि काहीजण म्हणतात कारवाई केल्यानंतर राणे मवाळ झाले. मी त्यांना सांगू इच्छितो की मवाळपणा माझ्या रक्ततात नाही. मी अनेक लोकांशी लढलो, शिवसेनेच्या विरोधकांशी लढलो शिवसेनेत असताना. आज जे संरक्षण मिळालेलं आहे ते १९९१ पासून माझ्याकडे संरक्षण आहे.”

बाळासाहेब गेले अन् ठाकरे भाषा तिथेच संपली; कुणीही आव आणू नका – नारायण राणे

तसेच, “मी राजकारणात किंवा कुठही काम करताना, फायद्याचं किती ठरेल याचा विचार करत नाही. आपल्याला लोकांच्या फायद्याची गोष्ट समजून घेऊन, त्यांच्यासाठी भांडणं. एवढच नाही आपल्या जीवाची पर्वा न करता, समोरच्यावर तुटून पडणं हा माझा स्वभाव गुणच आहे. हे नैसर्गिक आहे ते काय आव आणून येत नाही. उगाच हात वर करून आवेष दाखवण्याला लोकं हसतात. वाक्य कुठं हात वर कुठे, माझ्या जो आवेष आहे जिद्द आहे. हे माझ्या रक्तातच आहे.” असंही यावेळी नारायण राणे यांनी बोलून दाखवलं.