महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज इर्शाळवाडीचा दौरा केला. आपल्या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अशा घटना घडू नयेत.. किंवा अशा आपत्ती आल्या तर त्याला एकत्रितपणे तोंड देण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. तसंच आज मी सरकारकडे पक्ष म्हणून नाही तर जनतेचं सरकार म्हणून पाहतो आहे कारण लोकांना मदतीची अपेक्षा आहे. इर्शाळवाडीतले जे लोक वाचले आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि भविष्यात डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांबाबत अशी घटना घडू नये म्हणून ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एवढंच काय त्यांच्यासमोर जाताना मला लाज वाटत होती असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“आज त्यांच्यासमोर जाताना मला लाज वाटत होती. मी यांना काय देऊ शकतो? तुमच्या दुःखात सहभागी आहे हे कोरडे शब्द देऊन काय होणार आहे? हा कोरडेपणा लाजीरवाणा झालेला आहे. दरवर्षी अशा घटना घडणं लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री असताना दोन चक्रीवादळं आली होती. निसर्ग आणि तौक्ते.. तेव्हा किनारपट्टीचा धोका लक्षात घेऊन भूमिगत वीज योजना योजली होती. लोकांना चांगले निवारे तयार करण्याची योजना आखली होती. तसं आता यावर या सगळ्या वस्त्यांवर उपाय योजना केली पाहिजे. आपल्याकडे प्रशासन आहे, कलेक्टर, तलाठी, तहसीलदार सगळे आहेत. त्यांना बसवून मांडणी केली तर आपण ही संकटं टाळू शकतो.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडींचा धोका; दरडप्रवण गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवणार
डोंगर उतारांवर किंवा डोंगर उतारांवर ज्या वस्त्या घरं आहेत तिथे कधीही दरडी कोसळू शकतात. आमचं सरकार असताना तळियेची दुर्घटना घडली होती. होत्याचं नव्हतं झालेलं मी त्यावेळी पाहिलं आहे. आत्ताही या ग्रामस्थांशी बोललो, काय बोलू आणि काय सांत्वन करु? सरकार अशा घटना घडल्यानंतर जागं होतं आणि धावपळ करत. माझं प्रामाणिक मत हे आहे की सर्वच पक्षांनी याबाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे. मला आज एक प्रश्न विचारण्यात आला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. प्रकल्पग्रस्त, आदिवासी यांच्यासह अनेक लोक आहेत ज्यांना असं आयुष्य जगावं लागतं. टांगती तलवार असते तशी दरड कधी अंगावर येईल ते त्यांना माहित नाही. अशा लोकांच्या पुनर्वसनाची एक ठोस योजना करणं आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री असताना या योजनेला सुरुवात करत होतो मात्र त्यानंतर आमचं सरकार बदललं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- मनुष्यबळासह मारिया, फिरो आणि जॉकीसुद्धा मदतीला; बचावकार्यात अडचणी येत असल्याने श्वानपथक तैनात
सरकार कुणाचंही येओ पण अशा योजनांना स्थगिती देता कामा नये इतकी माणुसकी आपण ठेवली पाहिजे. तळियेला मी जाणार आहे तिथलाही आढावा घेणार आहे. आपण राजकारणी म्हणून जेव्हा मतं मागायला जातो तेव्हा लाज वाटली पाहिजे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. या सगळ्यांना घरं दिली तरीही त्यांच्या उदरनिर्वाहाचीही सोय केली गेली पाहिजे. या प्रकारच्या योजना आखल्या पाहिजे. सरकार येणं, निवडणुका होणं हे होतच राहिल पण अशा सगळ्यांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे.
