मुंबईतला जसा महासागर आहे त्या महासागरासारखे बाळासाहेब ठाकरे होते. प्रसंगी शांत, पण आवश्यक असेल तेव्हा तुफानापेक्षा जास्त असा संघर्ष करणारे असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातल्या आणि नेत्यांच्या मांदियाळीतले आपलं वेगळेपण जपणारे नेते होते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बाळासाहेबांचं तैलचित्र आज या ठिकाणी लागतं आहे. मात्र हयात असताना या सभागृहात येण्याचा विचार त्यांनी कधीही केला नाही. त्यांनी मनात आणलं असतं तर ते मुख्यमंत्रीही होऊ शकले असते. मात्र त्यांनी तसं केलं नाही.
हक्कभंग आला तेव्हा काय झालं होतं?
छगन भुजबळ यांनी जेव्हा पक्ष बदलला, त्यावेळी राज ठाकरेंनी सामनामध्ये एक व्यंगचित्र काढलं आणि ते व्यंगचित्र त्या वेळच्या विधानसभा अध्यक्षांचं होतं. त्यावेळी आर. आर पाटील यांनी हक्कभंग आणला. त्या हक्कभंगाच्या निमित्ताने तो समितीकडे गेला. समितीने असा निर्णय केला की प्रबंध संपादक म्हणजे मुख्य संपादक आहेत त्यांना बोलावलं गेलं पाहिजे. बाळासाहेबांना समितीने बोलावलं. खरंतर बाळासाहेब हे एक पत्रकार, व्यंगचित्रकार होते. त्यांना हा प्रश्न पडला होता की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुढाकार करावा की लोकशाहीने जी मूल्यं दिली आहेत त्यानुसार ज्या समितीसमोर जायचं तिथे आपण जावं. लोकशाहीवर विश्वास असल्यानेच ते समिती समोर गेले. तिथेही त्यांनी त्यांची विनोदबुद्धि दाखवून दिली असाही किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे दिलदार व्यक्ती
बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व दिलदार होतं. कुठलाही व्यक्ती मोठा कधी होतो जेव्हा तो दिलदार असतो. मनाचा मोठेपणा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता. त्यांच्या सोबतच्या लोकांनी तो अनुभवला पण तो त्यांच्या विरोधकांनीही अनुभवला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे हे स्पष्टवक्ते होते
एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आय अॅम मॅड मॅड हिंदू. बाळासाहेब ठाकरे स्पष्टवक्ते होते. बोलत असताना त्यांचं जे कनव्हिक्शन असायचं त्यामुळे त्याचा प्रभाव पडायचा. राजकारणात असे फार कमी लोक असतात ज्यांना एकदा बोललेलं वाक्य मागे घ्यायची वेळ येत नाही. बाळासाहेब ठाकरे हे असे नेते होते जे बोलले ते कधीच मागे घेतलं नाही. राजकीय बेरजेसाठी त्यांनी कधीच राजकारण केलं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तरूण जोडले गेले कारण..
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली. त्यामुळेच त्यांच्यासोबत तरूण जोडले गेले. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही जातपात पाहिली नाही. एखाद्या समाजाचे जास्त लोकं असतील तेव्हा त्या समाजाचा उमेदवार द्यावा का? असा विचार राजकीय पक्ष करतात. मात्र ज्यांचे चार लोकंही नाहीत त्या व्यक्तीला तिकिट देऊन त्याला निवडून आणण्याचा करीश्मा बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखवलं. राजकारणातला जातीयतेचा पगडा त्यांनी दूर केला.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं धन आपल्याकडे आहे
आपल्यात आज बाळासाहेब ठाकरे नाहीत. मात्र त्यांच्या विचारांचं धन आपल्याकडे आहे. जे त्यांनी आपल्याला शिकवलं आहे ती शिकवण आपल्यासोबत कायम राहिल. विधानमंडळाचा प्रत्येक सदस्य हा महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन त्या व्यक्तीला होईल. हिंदुत्त्वाचा हुंकार प्रत्येक सदस्याला प्रेरणा देईल याबाबत माझ्या मनात शंका नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.