Girish Mahajan On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुती सरकारमध्ये नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ हे चांगलेच नाराज झाले होते. त्यानंतर भुजबळांनी अनेकदा अजित पवारांवर टीका देखील केली होती. एवढंच नाही तर जहां नहीं चैना, वहां नहीं रहना असं म्हणत भुजबळांनी सूचक इशाराही दिला होता.
त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. मात्र, यानंतर अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं आता जात आहे. यानंतर आता छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठं विधान केलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर छगन भुजबळ पालकमंत्री काय तिसरे उपमुख्यमंत्री देखील होतील’, असं म्हणत गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली असली तरी त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “बरोबर आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय ते शक्य होणार नाही”, असं महाजन यांनी म्हटलं.
तसेच छगन भुजबळ मंत्री झाले आहेत, आता ते नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार असल्याची चर्चा आहे असं विचारलं असता यावर गिरीश महाजन म्हणाले की, “चांगलं आहे, दावा करणं काय वाईट आहे? देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं. ते (छगन भुजबळ) आणखी तिसरे उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात. हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. कोणाला पालकमंत्री करायचं? कोणाला उपमुख्यमंत्री करायचं? कोणाला मंत्री करायचं? हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ते पुढे असंही म्हणाले की असं कोणीही काही म्हटलेलं नाही. पण तुम्ही असं तेल टाकू नका, असंही गिरीश महाजन यांनी मिश्किलपणे म्हटलं.