Javed Akhtar: शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर १०० हून अधिक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. या अनुभवावर आधारित आणि त्यावेळच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देणारे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक संजय राऊत यांनी लिहिले आहे. ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जावेद अख्तर यांनी संजय राऊत आणि त्यांची मैत्री कशी झाली, तसेच व्यक्त होण्यामुळे कट्टरपंथीयांचा त्रास कसा भोगावा लागतो, याची माहिती दिली.
संजय राऊत आयपीएलचे खेळाडू
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, संजय राऊत यांचा स्वभाव हा आयपीएलच्या खेळाडू प्रमाणे आहे. ते बॅकफूटवर चेंडू खेळून काढण्यात विश्वास ठेवत नाहीत. ते क्रिझमधून बाहेर पडून चौकार आणि षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची भीती वाटत नाही.
जावेद अख्तर पुढे म्हणाले, लोकशाहीत संसद, निवडणुका, नेते, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष, प्रामाणिक माध्यम्यांची गरज आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाची फिकीर न करता व्यक्त होणाऱ्या नागरिकांचीही आवश्यकता असते. मी त्यातलाच एक व्यक्ती आहे. तुम्ही एकाबाजूने बोलत असाल तर दुसऱ्या बाजूच्या लोकांना नाराज करता. पण तुम्ही सर्वच बाजूंनी बोलायला लागलात, तर अनेकांची नाराजी ओढवून घेता. माझ्याबाबत तसेच होते. मला दोन्हीकडून शिव्या देणारे आहेत.
पाकिस्तान ऐवजी मी नरक निवडेन
मला दोन्ही बाजूचे कट्टरपंथीय शिव्या घालतात. एका बाजूचे म्हणतात, ‘तू काफीर आहेस नरकात जाशील’. तर दुसऱ्या बाजूचे म्हणतात, ‘जिहादी तू पाकिस्तानला निघून जा’. आता जर माझ्याकडे पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरकातच जाणे पसंत करेन, असे जावेद अख्तर म्हणाले आहेत.
३० वर्षांत चार वेळा संरक्षण
जावेद अख्तर कट्टरपंथीयांच्या उपद्रवाची माहिती देताना म्हणाले की, मी १९ वर्षांचा असताना मुंबईत आलो होतो. आज जो काही आहे, तो मुंबईमुळेच. हे कर्ज मी सात जन्मात उतरवू शकत नाही. मागच्या ३० वर्षांत चार वेळा मला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. त्यातील तीन वेळा मुल्लांनी दिलेल्या धमक्यामुळे संरक्षण दिले गेले.
या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमुल काँग्रेसचे नेते, खासदार साकेत गोखले उपस्थित राहिले होते.