सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा आणि दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील लोहखनिज उत्खननात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला आहे. सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधित खनिकर्म अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे.
सावंतवाडी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ म्हणाले की, सातार्डा येथे डेक्कन मिनरल कंपनीला एका विशिष्ट सर्व्हे नंबरमध्ये उत्खननाची परवानगी असताना, परवानगी नसलेल्या इतर ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे. यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाला असून, हा पैसा कोणाच्या खिशात गेला, याची चौकशी झाली पाहिजे. याला अधिकारी, आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचे आशीर्वाद असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बाबुराव धुरी यांनी सांगितले की, उत्खनन आणि वाहतूक यात मोठा गोलमाल सुरू आहे. सातार्डा येथे मंजूर केलेल्या लीजच्या सर्व्हे नंबरमध्ये उत्खनन न करता दुसऱ्याच ठिकाणी केले गेले आहे. तसेच, कळणे येथील खनिज बेकायदेशीरपणे उत्खनन करून कर्नाटकात नेले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोपर्यंत खनिकर्म अधिकाऱ्याला निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही धुरी यांनी दिला.
या बेकायदेशीर उत्खननामुळे तयार झालेली दरड पावसाळ्यात लोकवस्तीत कोसळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावरही अप्रत्यक्षपणे या गैरव्यवहाराला आशीर्वाद असल्याचा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. धुरी यांनी सरकारवर इतर मुद्द्यांवरही टीका केली. दोडामार्ग तालुक्यात आठ महिन्यांपासून तहसीलदार नसल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे येत आहेत. याशिवाय, अकरावीचे वर्ग अद्याप सुरू झाले नाहीत, त्यामुळे सरकार शिक्षण, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, उप-जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उप-तालुकाप्रमुख अशोक धुरी, लक्ष्मण आयनोडकर, विभागप्रमुख प्रशांत बुगडे, विजय जाधव, गुणाजी गावडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.