अहिल्यानगर: महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर दाखल गुन्ह्यात आता ‘ॲट्रोसिटी’चे कलम वाढवण्यात आले आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, काळे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.

एका पीडितेला मदतीच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी काळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्यांना अटक करून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्याची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर काळे यांच्या वतीने ॲड. अभिजित पुप्पाल यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांनी सरकार पक्षाला व फिर्यादीला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. आज, मंगळवारी सुनावणीवेळी सरकार पक्षाकडून म्हणणे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढवून मागण्यात आली. न्यायालयाने या जामीन अर्जावर आता १ ऑगस्टला सुनावणी ठेवल्याचे ॲड. पुप्पाल यांनी सांगितले.