अहिल्यानगर: श्रीरामपूरमधील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या, पोषण आहारातील गंभीर तक्रारी, ढिसाळ आरोग्य सेवा, पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार, रस्त्यांवरील खड्डे, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या चोऱ्यांवरून आमदार हेमंत ओगले यांच्या अध्यक्षतेखालील आमसभा गाजली. अधिकाऱ्यांनी कारभार करताना काळजी घ्यावी अन्यथा सज्जड कारवाई होईल, असा इशारा आमदार ओगले यांनी दिला.
श्रीरामपूरमधील प्रशासकीय इमारतीत झालेल्या सभेला प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, जीवन प्राधिकरणाचे अभियंता सुरेश गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, काँग्रेसचे सचिन गुजर, माजी सभापती शरद नवले व बाबासाहेब दिघे, सुधीर नवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के यांनी प्रास्ताविक केले.
पोषण आहारात किडलेले धान्य देण्याचे प्रकार निदर्शनास आल्याचे सांगत आमदारांनी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना जाब विचारला. यात सुधारणा न झाल्यास कारवाई करू, असा इशारा दिला. टाकळीभान आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेमुळे आमदारांचा पारा चढला. निकृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने हलवून नवीन अधिकारी नेमावा, असा आदेश तालुका आरोग्यधिकारी मोहन शिंदे यांना देण्यात आला.
पाणीपुरवठा योजनेबाबत मोठ्या तक्रारी आल्याने जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. दत्तनगर योजना केवळ ३० टक्केच पूर्ण असून ठेकेदारावर दंड ठोठावला असल्याचे अभियंता गायकवाड यांनी सांगितले. रस्त्यांवरील खड्डे, अपुरा निधी व निकृष्ट दर्जाचे काम हाच सभेतील मुख्य रोषाचा विषय ठरला. रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गोदावरी व प्रवरा नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरीस जाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र पूर्वसूचना देऊनही श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक सभेला अनुपस्थित राहिल्याने संताप व्यक्त झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी त्यांच्या निलंबनाचा ठराव मांडला.
अनामत रक्कम भरूनही नळजोडणी न मिळाल्याकडे कारेगावच्या ग्रामस्थांनी लक्ष वेधले. पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे आमदार ओगले यांनी जाहीर केले. आमदार ओगले यांनी यापूर्वीही श्रीरामपूरमध्ये सभा आयोजित करत विविध समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळीही अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या होत्या.