अहिल्यानगरः इयत्ता दहावीचा निकाल राज्य परीक्षा मंडळाने आज, मंगळवारी दुपारी जाहीर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल २.७५ टक्क्यांनी घसरला आहे. यंदाचा निकाल ९१.८५ टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच उत्तीर्णच्या प्रमाणात अधिक बाजी मारली आहे.
गेल्या वर्षी सन २०२४ मध्ये जिल्ह्याचा निकाल ९४.५६ टक्के लागला होता तर सन २०२३ मध्ये ९३.९० टक्के लागला होता. यंदा २०२५ मध्ये जिल्ह्यामधील मुलांचे उत्तीर्णचे प्रमाणे ८९.२९.टक्के तर मुलींचे प्रमाण ९५.०३ टक्के आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ६७ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, पैकी ६६ हजार ८५८ विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले. त्यातून ६१ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
परीक्षेसाठी ३७ हजार २६२ मुले तर ३० हजार ९६ मुली असे एकूण ६७ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६ हजार ९७८ मुले व २९ हजार ८८० मुलींनी परीक्षा दिली. ३३ हजार १७ मुले तर २८ हजार ३९५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ६ टक्के अधिक आहे.
जिल्ह्यात श्रीगोंदा, संगमनेर व अकोल्यात मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. श्रीगोंदा ९७.७४ टक्के, संगमनेरमध्ये ९७.४३ तर अकोल्यात ९७.०३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
तालुकानिहाय टक्केवारी
तालुकानिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- अकोले ९५.०५ टक्के, जामखेड ९३.८१, कर्जत ९४.१८, कोपरगाव ९३.३७, अहिल्यानगर ९३.०७, नेवासे ८८.६४, पारनेर ९४.५४, पाथर्डी ८६.७७, राहता ९०.९८, राहुरी ९१.९९, संगमनेर ९५.५६, शेवगाव ८०.६६, श्रीगोंदे ९५.२, श्रीरामपूर ९०.३० टक्के. एकूण ९१.८५ टक्के.