अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ५८ लाख २० हजार ५८६ रुपयांचा अपहर केल्याच्या आरोपावरून दोघा कनिष्ठ सहायक पदावरील कर्मचाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सहायक लेखा अधिकारी रावसाहेब शंकर फुगारे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

दि. १२ जानेवारी २०२४ ते २१ ऑगस्ट २०२४ दरम्यान हा अपहार घडला. फिर्यादीत म्हटले आहे की, कनिष्ठ सहायक (लेखा) अशोक अंबादास पंडित याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या देयकातून कपात केलेल्या आयकर, जीएसटी, विमा, कामगार कल्याण निधी, सुरक्षा, अनामत दंड आदी शासकीय कपातींचा भरणा संबंधित खात्यावर न भरता कनिष्ठ सहायक रोहित शशिकांत रणशूर याच्या कॅशबुकमध्ये सह्या घेऊन वैयक्तिक एचडीएफसी व स्टेट बँकेत तसेच वैयक्तिक पॅन क्रमांकावरील खात्यात, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून भरल्या व अपहर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ही बाब नोव्हेंबर २०२४ दरम्यान निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ३ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू तुकाराम लाकूडझोडे, लेखा अधिकारी महेश पांडुरंग कावरे, सहायक लेखाधिकारी राजेंद्र मधुकर डोंगरे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी प्रमोद पुंडलिक राऊत, वरिष्ठ सहायक लेखा जगदीश अशोक आढाव व वरिष्ठ सहायक (लेखा) सुदाम रामदास बोंदर्डे यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने ३ जानेवारी २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दोघांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देऊन फिर्याद देण्यासाठी सहायक लेखाधिकारी रावसाहेब फुगारे यांना प्राधिकृत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील कनिष्ठ सहायक (लेखा) अशोक पंडित हा १ जून २०२४ रोजी पाथर्डी पंचायत समिती येथून विनंती बदलीने जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाममध्ये (उत्तर विभाग) हजर झाला. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याला वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आले. त्यामुळे बांधकाम विभागातील त्याच्याकडील कार्यभार रोहित रणशूर याच्याकडे सोपवण्यात आला. अशोक पंडितला ४ डिसेंबर २०२३ रोजी कार्यमुक्त केलेले असतानाही त्याने तब्बल ५० दिवस स्वतःकडेच बांधकाम विभागाचा कार्यभार ठेवला. त्यामुळे त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर २३ जानेवारी २०२४ रोजी रोहित रणशूर याच्याकडे त्याने कार्यभार सोपवला. शासकीय योजनांच्या देयकातील कपातीच्या रकमा बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यात भरणे आवश्यक असताना त्याने स्वतःच्या खात्यावर भरल्या. यासाठी डिमांड ड्राफ्ट जमा करताना अशोक पंडितने कार्यकारी अभियंता व पाथर्डी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या पत्रावर करिता म्हणून स्वतःच्या साह्या केल्या, असे चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.