अकोले: पाणलोटात पडलेला ४.५ हजार मिमी पाऊस, धरणात आलेले २० टीएमसी पाणी तर धरणातून सोडले १२ टीएमसी पाणी. पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांतील भंडारदरा धरणाचा हा लेखाजोखा तर याच काळात निळवंडेमधून १२.५ टीएमसी म्हणजे निळवंडेच्यां क्षमतेच्या दीडपट पाणी प्रवरा नदीतून जायकवाडीसाठी वाहिले. तालुक्यातील भंडारदरा, निळवंडे आणि आढळा ही तिन्ही धरणे पावसाळा संपायला एक महिना असताना शंभर टक्के भरलेली आहेत.
अकोले तालुक्याचा पश्चिम भाग पावसाचे आगर समजला जातो. मुळा, प्रवरा, आढळा या जिल्ह्यांतील प्रमुख नद्या या भागातच उगम पावतात. कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्र गडाच्या डोंगर रांगांत पडलेल्या पावसावरच मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील मोठ्या धरणांचे आणि पर्यायाने जिल्ह्याच्या उत्तर भागाचे भवितव्य अवलंबून असते. या वर्षी पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांत धरणांच्या पाणलोटात मुबलक पाऊस पडला. या परिसरात मान्सून तसा उशिरा दाखल झाला पण त्यानंतर अनेक दिवस मुसळधार पाऊस कोसळला. एक जूनपासून आजपर्यंत भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे ४ हजार ६८७ मिमी पाऊस पडला.
रतनवाडीच्या पाठीशी असणाऱ्या रतनगडावर प्रवरा नदी उगम पावते तर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे ४ हजार ५५३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भंडारदऱ्यात पाण्याची मोठी आवक झाली. एक जून ते ३१ऑगस्टपर्यंत भंडारदरा धरणात २० हजार ७२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले. या वर्षी धरणात पावसाळा सुरू होताना अडीच टीएमसीपेक्षा अधिक पाणी शिल्लक होते. त्यामुळे आलेल्या पाण्यापैकी ८ हजार २७३ दलघफूट पाणीच धरणात साठविले गेले तर ११ हजार ७९९ दलघफूट पाणी सोडून देण्यात आले. भंडारदरा धरणाची साठवण क्षमता ११ हजार ३९ दलघफूट आहे. म्हणजेच क्षमतेइतके पाणी तीन महिन्यांत धरणातून सोडण्यात आले.
१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत निळवंडे धरणात २१ टीएमसी पाणी आले. यातील ५ हजार ९४६ दशलक्ष घनफूट पाणी धरणात साठविले गेले तर उर्वरित १५ हजार ३६ दलघफूट पाणी धरणातून सोडून देण्यात आले. यातील २ हजार ४२९ दलघफूट पाणी धरणाच्या दोन्ही कालव्यातून तसेच उच्चस्तरीय कालव्यातून सोडण्यात आले. बाकीचे पाणी सांडव्यातून तसेच वीजनिर्मिती केंद्रातून नदी पात्रात पडले. १२.५ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून वाहिले. निळवंडे धरणाची साठवण क्षमता ८ हजार ३२० दलघफूट आहे. याचाच अर्थ निळवंडे धरणाच्या क्षमतेच्या दीडपट पाणी जायकवाडीकडे तीन महिन्यात वाहिले. येथून पुढे धरणात जमा होणारे सर्व पाणी सोडून द्यावे लागणार आहे.