डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज (२२ ऑक्टोबर रोजी) पहाटे दापचरी सीमा तपासणी नाक्यावर गुजरात परिवहन बसने एका क्रेनला धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये क्रेन सहाय्यकाचा मृत्यू झाला असून एकूण सात प्रवासी जखमी झाले. मुंबईहून गुजरातकडे निघालेला एक क्रेन सीमा तपासणी नाक्यावर छोट्या वाहनांसाठी असलेल्या मार्गावर गेला. पुढे बॅरिकेड्स असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चालक क्रेन पुन्हा मागे घेण्याच्या प्रयत्नात असताना मागून येणाऱ्या गुजरात परिवहनच्या बसने अंधारात क्रेनला धडक दिली. पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात क्रेनमधील सहाय्यक अनिकेत संतोषकुमार कौंडल (२०) (बरवाला, हिमाचल प्रदेश) याचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : सांगलीत शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात भव्य मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दापचरी सीमा तपासणी नाक्यावर छोट्या वाहनांसाठी ठेवलेल्या रस्त्यावर बॅरिकेड्स ठेवल्यामुळे येथून मोठ्या वाहनांना जाण्यासाठी मार्ग नाही. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक अथवा उपाययोजना नसल्यामुळे मोठी वाहने चुकून या रस्त्यावरून जात असून अपघात वारंवार झाले आहेत. मध्यंतरी डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी याठिकाणी बुलडोझर घेऊन बॅरिकेड्स हटवले होते, तसेच दोन दिवसांपूर्वी खासदार राजेंद्र गावित यांनी हे अडथळे हटविण्याचे सूचित केले होते. मात्र याठिकाणी बॅरिकेड्स पूर्ववत राहिल्याने हा अपघात झाला, असे जाणकारांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे.