धाराशिव : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तब्बल पावणे चार कोटी रूपयांची देणगी जमा झाली आहे. देणगी दर्शन, दानपेटीत अर्पण केलेली रोकड आणि इतर धार्मिक विधींच्या माध्यमातून ही रक्कम तुळजाभवानी मंदिर संस्थानला प्राप्त झाली आहे. याच कालावधीत भाविकांनी मोठ्या श्रध्देने सोने आणि चांदी देखील मोठ्या प्रमाणात देवीचरणी अर्पण केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील भाविक नवरात्रोत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर शहरात दरवर्षी मोठी गर्दी करतात.

कोरोना काळानंतर दोन वर्षे भाविकांची संख्या रोडावली होती. मात्र मागील वर्षीपासून जगदंबेच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वरचेवर वाढताना दिसत आहे. १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या नऊ दिवसांच्या कालावधीत पेड दर्शन घेणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. तीन लाख ७३ हजार २४७ भाविकांनी तुळजाभवानी मंदिर समितीकडे अधिकृतपणे पैसे जमा करून देणगी दर्शन घेतले. त्यातून तुळजाभवानी मंदिर संस्थानला एक कोटी ९३ लाख ६६ हजार ४६२ रूपये रोख स्वरूपात प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रध्देने दानपेटीमध्ये तब्बल दीड कोटींहून अधिक रूपयांची रोकड मोठ्या भक्तीभावाने अर्पण केली आहे.

हेही वाचा : “उपोषणामुळे त्याला किडन्यांचा…”, संभाजीराजेंनी सांगितली मनोज जरांगेंच्या प्रकृतीविषयी माहिती; म्हणाले, “बिचाऱ्याला…”

मागील नऊ दिवसांच्या कालावधीत तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीमध्ये एक कोटी ५७ लाख ४२ हजार ७३० रूपये जमा झाले असल्याची अधिकृत नोंद आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळे कुलाचार आणि धार्मिक विधीपोटी मंदिर प्रशासन कार्यालयात पावती फाडून रोख रक्कम जमा करणार्‍या भाविकांची संख्याही मोठी आहे. वेगवेगळ्या धार्मिक विधीपोटी १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान २२ लाख ३९ हजार ५७७ रूपये इतका महसूल तुळजाभवानी मंदिर समितीला प्राप्त झाला आहे. देणगी दर्शन, दानपेटी आणि इतर माध्यमातून मिळालेली ही सर्व रक्कम तीन कोटी ७३ लाख ४८ हजार ६७९ रूपये एवढी आहे.

हेही वाचा : बँकेमध्ये जम्बो भरती, त्वरित अर्ज करा, शेवटचे पाच दिवस राहिले

पाऊण किलो सोने, बारा किलो चांदी

तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने समाधानी झालेला भक्तवर्गाने मोठ्या श्रध्देने देवीचरणी वेगवेगळ्या मौल्यवान दागदागिन्यांच्या रूपाने आपला भक्तीभाव अर्पण केला. त्यामुळे तुळजाभवानी चरणी दरवर्षी वाहिक दागदागिन्यांची एकूण संख्या लक्षवेधी आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात तुळजाभवानी चरणी ७३६ ग्रॅम सोने आणि ११ किलो ९५४ ग्रॅम चांदी अर्पण करण्यात आली असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे प्रशासकीय अधिकारी सिध्देश्वर शिंदे यांनी दिली आहे.